

Health Minister's sudden attack on Mini Ghati Hospital in the middle of the night
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा येथील मिनी घाटी रुग्णालयात शनिवारी (दि.६) मध्यरात्री १ वाजता अचानक राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देत पाहणी केली. रुग्णसेवेत काही त्रुटी दिसल्याने मंत्री आबिटकर नाराज झाले. तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्या, रुग्णसेवा अधिक शिस्तबद्ध आणि वेळेवर देण्याचे कठोर निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मिनी घाटीतील आपत्कालीन विभाग, स्वच्छता व्यवस्था, औषध साठा, यंत्रसामग्री, विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी करत आबिटकर यांनी रुग्णांशीही संवाद साधला. उपचाराची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा तसेच सेवा वेळेत मिळत आहेत का, याची त्यांनी वैयक्तिक चौकशी केली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषण रामटेके, डॉ. पद्मजा सराफ तसेच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हजर होते.
रुग्णसेवेत कुठलीही हयगय नको पाहणीदरम्यान आबिटकर म्हणाले, रुग्णसेवेत कुठलीही हयगय नको, आहाराच्या गुणवत्तेत तडजोड सहन केली जाणार नाही. औषध साठा, यंत्रसामग्री कार्यरत स्थितीत ठेवावी, असे त्यांनी आदेश दिले. माता-प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, लसीकरण मोहीम गतीने राबविणे आणि शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यावरही त्यांनी भर दिला. तसेच कारवाईचा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.