

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे आरोग्य व्यवस्था अडचणीत आली आहे. विशेषतः महिला आरोग्य सेविका (परिचारिका) यांच्या तब्बल २२९ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील माता-बाल संगोपन, लसीकरण आणि प्राथमिक आरोग्यसेवा प्रभावित होत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २४९ उपकेंद्रे कार्यरत आहेत.आरोग्य समितीच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोग्य सेवक (पुरुष) यांची २७५ पदे मंजूर असून त्यापैकी २४३ पदे भरलेली आहेत, तर ३२ पदे रिक्त आहेत. महिला आरोग्य सेविका अर्थात परिचारिकांची ४९१ पदे मंजूर असताना केवळ २६२ पदे भरलेली असून २२९ पदे रिक्त आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११९ मंजूर पदांपैकी केवळ ७२ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित रिक्त पदांची जबाबदारी ३९ कंत्राटी डॉक्टरांवर आहे. आरोग्य सहायक (पुरुष) यांच्या ७७ मंजूर पदांपैकी ७२ पदे भरलेली असून पाच पदे रिक्त आहेत. तसेच औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) यांच्या ६० मंजूर पदांपैकी ५३ पदे भरलेली असून सात पदे रिक्त आहेत.
आरोग्यसेवेचा भार तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर दरम्यान, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी स्थायी समिती व आरोग्य समितीच्या बैठकीत समोर आल्या. काही वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात वास्तव्यास राहत नसल्याने नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत गैरहजर रा-हणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, रिक्त पदांचा मोठा आकडा आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे ग्रामीण आरोग्यसेवेचा गाडा सध्या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.