

The road up to Ahilyanagar has been damaged due to recent heavy rains.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरपर्यंत रस्ता चाळणी झाला आहे. त्यामुळे पुणे गाठण्यासाठी चार तासांऐवजी सहा ते सात तासांचा वेळ लागत असल्याने एसटीचे ऐन दिवाळीत नियोजन बिघडले असून, याचा उत्पन्नात मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिवाळीत सर्वात जास्त गर्दीचा आणि उत्पन्न देणारा मार्ग म्हणजे पुणे मार्ग आहे. या मार्गावरील प्रवाशांना आरामदाई आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी केवळ ई-शिवाई बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गावर तब्बल ३६ शिवाई व इतर २० बस अशा गुरुवारपासून सेवा देत आहेत. दरम्यान, शहराबाहेर पडताच अहिल्यानगरपर्यंत रस्त्याची चाळणी झाल्याने त्याचबरोबर या मार्गार दिवाळीची गर्दी वाढल्याने बसला मुंग्याच्या पावलाने चालण्याची वेळ आली आहे.
यामुळे चार तासांच्या प्रवासासाठी सहा ते सात तासांचा वेळ लागत आहे. यामुळे एसटीच्या अतिरिक्त फेरीचे नियोजन पुरते ढासळले आहे. बस, कर्मचारी आणि प्रवाशांचा प्रतिसाद असूनही वेळेचे नियोजन होत नसल्याने एसटीचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
११० किलोमीटरसाठी चार तास छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हे ११० किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर एसटी अडीच तासांपर्यंत पार करते. दरम्यान, सध्या वाहनांची गर्दी आणि रस्त्याची चाळणी झाल्यामुळे यासाठी तब्बल चार तास लागत आहेत. त्यामुळे हा प्रवास एसटी बरोबरच प्रवाशांनाही कंटाळवाणा होत आहे. कमीत कमी दिवाळी सणासाठी तरी रस्त्याची दुरुस्ती करायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत.
एसटीला आर्थिक फटका
पुणे मार्गावर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत दर अर्ध्या तासाला बस उपलब्ध आहे. या मार्गावर तब्बल ५६ बस धावत आहेत. तासांच्या नियोजनुसार एसटीला चांगले उत्पन्न मिळणार होते, परंतु एसटीच्या या स्वप्नावर रस्त्याने पाणी फेरले आहे. दोन ते तीन तासांच्या विलंबामुळे अतिरिक्त फेरीचे गणित बिघडले आहे. याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार आहे.