

Furnace oil tanker explodes while welding
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : फर्निस ऑईलची वाहतूक करणाऱ्या रिकाम्या टैंकरला गॅस वेल्डिग करताना आग लागून टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात टँकरच्या मागील पत्राच्या ठिकऱ्या होऊन पत्रा लांब उडाल्याने या घटनेत खुर्चीवर बसलेला खानावळ चालक ठार, तर एक जण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१७) दुपारी वाळूज एमआयडीसीच्या कामगार चौकातील ट्रक टर्मिनलजवळ घडली.
रफिक गोधन शेख (४८, रा. औरय्या इटावा, उत्तरप्रदेश ह.मु. गट क्रमांक २२५, कोहिनुर पार्क, तिसगाव ) असे ठार झालेल्या खानावळ चालकाचे नाव तर सचिन भालेराव हा कामगार किरकोळ जखमी झाला आहे. शेख रफीक यांचे गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून कामगार चौकातील ट्रक टर्मिनल जवळ छोटे खानी खानावळ चालवत होते. शुक्रवारी दुपारी रफीक यांच्या खानावळीच्या बाजूला असलेल्या छोटू भाई ट्रक बॉडी वेल्डिगवर्क्सचे कामगार फर्निस ऑइलची वाहतूक करणाऱ्या रिकाम्या टैंकर (एमएच २०, जिएस-२०१५) च्या लिक झालेल्या पाईपला गॅस वेल्डिग करत होते.
वेल्डिंग सुरु असतांना दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास अचानक टैंकरला आग लागली. त्यानंतर काही वेळात टँकरचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की टँकरच्या पाठीमागील पत्राचे ठिकऱ्या होऊन पत्राचा एक भाग ५०० फूट दुर उडाला. पत्राने खानावळ समोर खुर्ची टाकून बसलेल्या शेख रफिक यांच्या उजवा पाय पोटरीपासून कट होऊन पायाचा तुकडा १०० फूट अंतरावर जाऊन पडला. गंभीर जखमी झालेल्या शेख रफिक यांना परिसरातील दुकानदारांनी खासगी वाहनातून उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी टैंकर चालक खंडू अनिल गवळी (रा. उस्मानाबाद) यास चौकशीसाठी ठाण्यात नेले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.
दोन कंपन्यांचे देखील नुकसान
स्पोटात लोखंडी पत्राचा भाग उडून लगतच्या दर्शन प्लास्टिक कंपनी ऑफिसच्या खिडकीवर तसेच वैष्णवी इंजिनिअरिंग कंपनीच्या छतावर जाऊन आदळला. यात या कंपन्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले.
अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण
माहिती मिळताच अग्निशनम दलाचे उप अग्निशमन अधिकारी ए.स.देशमुख, के.टी. सूर्यवंशी, एल.जी. ब्राह्मणकर, एस.जी. वासनिक, एस.टी. मुळे, व्हि.एस. दाभाडे, पी. के. राठोड, डी.एस. काळे, पी.एस. खाडे, एस.बी. महाले, एन. एस. पारखे, चालक एस. के. गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर आग विझवली. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब काकड आदींनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.