

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासह मुख्य प्रवेशद्वार सुसज्ज करण्यासाठी ५ रस्त्यांवर पाडापाडीची मोहीम राबविली. यात ६ हजार मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. हे रस्ते सुसज्ज करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला जात असून, या कामासाठी स्मार्ट सिटीने १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच क्लीन स्ट्रीट अॅपसह स्मार्ट पार्किंगलाही मंजुरी दिली आहे.
यावेळी संचालक मंडळाच्या अध्यक्षा विनीता सिंघल, संचालक पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे, उल्हास गवळी, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, मुख्य वित्तीय अधिकारी उत्तम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. देशाच्या शंभर स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांची समस्या लक्षात घेत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाने तीन महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.
यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत महापालिकेने शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांवर रुंदीकरणाची मोहीम राबविली. यात प्रामुख्याने शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. या रस्त्यांच्या कामासाठी सविस्तर प्रकल्प अराखडा तयार केला जात असून, त्यासाठी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्यांचा सुसज्ज डीपीआर तयार करून तो शासनाकडून सादर करून रस्त्यांच्या कामासाठी निधी मागितला जाणार आहे. त्याशिवाय इतर कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांकडेही अहवाल सादर करून निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यानुसार स्मार्ट सिटीद्वारे ही तयारी सुरू केली आहे.
या ५ रस्त्यांचा समावेश
जालना रोड, पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट, जळगाव रोड, बीड बायपास, पैठण रोडचा समावेश आहे. हे रस्ते सुसज्ज करण्यासह त्यांच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड तयार केला जाणार आहे. या रस्त्यांच्या कामाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येत आहे.
क्लीन स्ट्रीट व स्मार्ट पार्किंग ॲप
शहरातील रस्त्यांवर अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने उभी करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, असे प्रकार दररोज विविध रस्त्यांवर सुरू असतात. हा प्रकार रोखण्यासाठी महापालिका स्मार्ट पार्किंग धोरण तयार करीत आहे. तसेच रस्त्यांच्या स्वच्छतेचे कामही केले जात आहे. यासाठी स्मार्ट पार्किंग अॅप आणि क्लीन स्ट्रीट अॅप तयार करण्यासही संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.