

छत्रपती संभाजीनगर : बहुचर्चित असलेल्या पिट लाईनचे काम किरकोळ कामांसाठी प्रलंबित पडले होते. आता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या असून, ही पिट लाईन सुरू करण्यासाठी नवीन वर्षात मुहुर्त मिळण्याची शक्यता असून, सीक लाईनच्या कामाने वेग घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
येथील रेल्वेस्थानकावरील पिट लाईनचे काम विविध कारणांमुळे प्रलंबित पडले होते. आता केवळ किरकोळ विद्युत कामे शिल्लक असून, हे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पिट लाईन नवीन वर्षात कार्यरत होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, रेल्वेच्या इतर देखभाल दुरुस्तीसाठी सीक लाईनही बनवण्यात येत असून, या कामालाही वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दुरुस्तीसाठी सीक लाईन पिट लाईन ही वॉशिंग लाईन असते. याचा वापर कोचच्या बेस पार्ट्सची तपासणी, डब्यांतील सांडपाणी बाहेर काढणे, अंडर फ्रेम, रनिंग गेट, सस्पेंशन, बफरस ब्रेक, कोचमनचे मेन डोअर, खिडक्यांची तावदाने आदी तपासणीने काम येथे केले जाते. सीक लाईनमध्ये रेल्वेतील बिघाड शोधून त्याची दुरुस्ती केली जाते. त्यासाठी ही लाईन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यामुळे मुक्कामी आलेल्या रेल्वेची देखभाल, दुरुस्ती वेळेवर होऊन त्यात प्रवाशांच्या सेवेत वेळेत मार्गस्थ होण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे प्रवासातील मोठ्या प्रमाणात वेळेची होऊ शकते अशीही माहिती रेल्वेच्या सुत्रांकडून देण्यात आली.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सुविधा
पिट सोबतच सीक लाईन तयार होत असल्याने छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्या येण्यास असलेला अडथळा दूर होणार आहे. त्यामुळे येथे देखभाल दुरुस्तीसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर येथून अनेक नवीन गाड्या सुरू होण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे. मागील अनेक वर्षापासून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु कराव्यात अशी मागणी मराठवाड्यातील प्रवासी विविध संघटना आणि स्थानिक आमदार, खासदारांकडून होत होती. या सुविधेमुळे त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.