

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : कोळवाडी येथील खडी मशीनवर गेल्या ५ ते ६ वर्षापासून मंजूर म्हणून काम करत असलेल्या पती पत्नीला खडी मशीन मालकांनी डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या मजुरांची कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्या आदेशानुसार शुक्रवारी ९ वाजता सुखरूप सुटका करण्यात आली.
याबाबत कामगार अधिकारी एस. पी. राजपुत, गोविंद गावंडे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आबा तांडा येथील शेख रशीद शेख गणी यांच्या कोळवाडी येथील खडी मशीनवर तालुक्यातीलच करंजखेडा येथील सुरेश सोनवणे, रेणुका सोनवणे हे दाम्पत्य गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मजुर म्हणून काम करत होते. परंतु ६ वर्षे झाली तरी आपला भाऊ घराकडे येत नसल्याने आपल्या भावाला आणि भावजय यांना शेख रशीद शेख गणी यांनी खडी मशीन येथे एका खोलीत डांबून ठेवले. याबाबतची तक्रार मजूर सुरेश सोनवणे यांचे भाऊ ज्ञानेश्वर सोनवणे यांनी कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्याकडे केली होती.
आयुक्तांच्या आदेशानुसार कामगार अधिकारी गोविंद गावंडे, कामगार अधिकारी एस.पी.राजपुत यांनी सितानाईक तांडा येथील खडी मशिनवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी चौकशी केली. असता सदरील कुटुंबाचा आणि खडी मशिन मालकाचा काही आर्थिक व्यवहार असल्याने मालक त्यांना गावाकडू जाऊ देत नसल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले. परंतु डांबून वैगरे ठेवलेले नसल्याचे देखील अधिका-यांच्या निदर्शनास आले असल्याचे कामगार अधिकारी एस.पी. राजपुत यांनी सांगितले.