

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासंदर्भात संपूर्ण राज्यातील मराठा समाज न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढत आहे, मात्र यामध्ये मराठा विद्यार्थी सर्वाधिक भरडला जात असल्यामुळे शुक्रवारी (दि.२८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठा समाजातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले, मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी विद्यापीठातील मराठा विद्यार्थ्यांनी भव्य आक्रोश मोर्चा काढला.
विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरु करण्यात आलेला आक्रोश मोर्चा प्रशासकीय इमारतीपर्यंत काढण्यात आला, या मोर्चामध्ये विद्यापीठातील विविध विभागाता शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच संशोधक विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी विद्यापीठ परिसर दुमदुमुन गेला.
मोर्चातील विद्यार्थ्यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले देण्यात यावे या मागणीचे निवेदन कुलगुरुंमार्फत सरकारला दिले. सर्वोच न्यायालयात मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली, याच पार्श्वभुमीवर विद्यापीठातील सर्व मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला. महाराष्ट्रातील मराठवाडा वगळता इतर विभागातील मराठा समाज हा कुणबी या जातीमध्ये गणला जातो, त्यांना आरक्षणाचे लाभही मिळत आहे, मराठा व कुणबी एकच असल्याने अनेक पुरावे असून राज्य मागासवर्ग आयोगाने त्या पुराव्यांच्या आधारे मराठा समाजाचे मागासलेपणही सिद्ध केले आहे.
सरकारने वेळकाढू भुमिका न घेता कायदेशिर व टिकणारे आरक्षण देणे समाजाला अपेक्षित आहे, त्यामुळे मराठा व कुणबी एकच समजून राज्य सरकारने मराठा समाजातील आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकाला सरसकट कुणबी जातीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांनी केली.
-हेही वाचा