छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा प्रेमासाठी देशाची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली अंजू आणि भारतात आलेली सीमा हैदर ही प्रकरणे ताजी असतानाच आणखी एक असेच प्रेम प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडलेली सिडकोतील एका व्यावसायिकाची पत्नी थेट सौदीला पळून गेल्याचे समोर आले, पण आता ती देश विघातक कृत्यात सहभागी झाल्याचा एक मेल पोलिसांना आल्यामुळे तिची चौकशी सुरू करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी दहशतवाद विरोधी पथकाने हे प्रकरण हाती घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.
अधिक माहितीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये शहरातील एक महिला बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या पतीने सिडको ठाण्यात नोंद केली होती. सोशल मीडियावर तिची एका पाकिस्तानी तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले व डिसेंबर महिन्यात ती त्याच्या मदतीने सौदीला पळून गेली होती.
काही महिने सौदी अरेबिया व इतर देशांमध्ये ती राहिली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती पुन्हा भारतात परतली. नाशिक जिल्ह्यातील माहेरी गेली. सध्या ती तेथेच राहत आहे. प्रियकराला सोडून ती परत का आली?, हा प्रश्न तिच्या नातेवाईकांना पडला. मात्र, आता तिच्या बाबत शहर पोलिसांना एका अज्ञाताकडून ईमेल आला आहे. ती सौदीत असताना देश विघातक कृत्य करीत होती, असा आरोप मेल मध्ये करण्यात आला आहे. याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी लगेचच हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविले. त्यांनी कसून तपास सुरू केला आहे. हा मेल नेमका कोणी पाठविला, त्याचा उद्देश काय? ती प्रियकराला सोडून परत का आली?, ती खरच प्रियकराकडे गेली होती का? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिस त्याची उत्तरे शोधत आहेत.
हेही वाचा :