Pakistan News | पाकिस्तानातून पोलिओ व्हायरस पसरण्याचा धोका, WHO ने प्रवास बंदी वाढवली | पुढारी

Pakistan News | पाकिस्तानातून पोलिओ व्हायरस पसरण्याचा धोका, WHO ने प्रवास बंदी वाढवली

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानातून पोलिओचा उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पाकिस्तानवरील प्रवास बंदी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. याबाबतचे वृत्त एआरवाय न्यूजने दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००५ च्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांसाठी बोलावलेल्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यातून जगभरात पोलिओ व्हायरसच्या प्रसाराचा धोका लक्षात येतो. (Pakistan News)

पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत

मुलांपर्यंत पोहोचून पोलिओचे निर्मूलन करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांबद्दल आरोग्य संघटनेच्या समितीने चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी चॅनेल एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, पोलिओ निर्मूलनाच्या बाबतीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने विशेष प्रयत्न केलेले नाहीत. पोलिओ निर्मूलनाच्या बाबतीत त्यांच्या प्रयत्नांमध्ये अनेक उणिवा दिसून आल्याचे समितीने नमूद केले आहे.

पेशावर आणि कराची येथील अलीकडील अनुकूल पर्यावरणीय चाचण्यांमुळे पाकिस्तानमध्ये पोलिओ महामारीचा धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानमध्ये वाइल्ड पोलिओव्हायरस टाइप १ (WP1) चा एक नवा रुग्ण आढळून आला, ज्यामुळे २०२३ मध्ये एकूण २ प्रकरणांची नोंद झाली आहे. दोन्ही रुग्ण खैबर पख्तूनख्वा (केपी) प्रांतातील बन्नू जिल्ह्यातील आहेत.

“दक्षिण खैबर पख्तूनख्वामधील कृती योजनेमुळे आणखी १ लाख ६० हजार मुलांना लसीकरण करण्यात आले असले तरी, अद्याप धोका कायम आहे. कारण राजकीय अस्थिरता, काही भागात असुरक्षिततेचे वातावरण, फ्रंट लाइन कामगारांना त्यांच्या सोबत आवश्यक असलेली पोलिसांची सुरक्षा आणि लसीकरणावर बहिष्कार आदी गोष्टींमुळे पोलिओ निर्मूलन मोहीम आव्हानात्मक बनली आहे,” असे जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीने पुढे म्हटले आहे.

अफगाणिस्तानात गेल्या काही दिवसांत पाच नवीन वाइल्ड पोलिओव्हायरस टाइप १ च्या रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण नांगरहार प्रांतातील असल्याचे आपत्कालीन समितीकडून सांगण्यात आले आहे. अफगाणिस्तानातील जास्त लोकसंख्येमुळे पाकिस्तानमधील पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाला धोका निर्माण झाला असल्याचा इशारा समितीने दिला आहे.

आपत्कालीन समितीने आणखी एक इशारा जारी केला आहे की पूर्व अफगाणिस्तानमध्ये वाइल्ड पोलिओव्हायरस टाइप १ चा झालेला प्रसार, पाकिस्तानमध्ये सीमेपलीकडून फैलाव आणि लसीकरणाचा अभाव यामुळे WPV1 चा पुन्हा धोका उद्भवला आहे.

WHO च्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल अँड हेल्थनुसार सर्व प्रवाशांनी पोलिओची संपूर्ण लस घेतली पाहिजे. प्रवासानंतर ४ आठवडे ते १२ महिन्यांच्या आत बाधित भागातील रहिवाशांनी (आणि ४ आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या व्यक्तींनी) OPV किंवा पोलिओ लस (IPV) चा अतिरिक्त डोस घ्यावा, असे ARY न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Pakistan News)

Back to top button