कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी येथील बुलढाणा अर्बन बँकेतील 70 ते 80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह तिघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी रोखपालास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे.
कळमनुरी येथील बुलढाणा अर्बन बँकेत खातेदारांनी त्यांच्या खात्यात भरलेल्या पैशावरच डल्ला मारण्यात आला. शाखा व्यवस्थापक वसंत घुगे (रा. येडुद, ता. औंढा), सहायक शाखा व्यवस्थापक संजय भोयर (रा. हातमाली ता. कळमनुरी), रोखपाल गजानन कुलकर्णी (रा. हिंगोली) व इतर कर्मचाऱ्यांनी संगणमत करून खातेदारांच्या बँक खात्यात असलेली रक्कम परस्पर काढली.
तसेच बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या खातेदारांना पैसे भरल्याच्या पावतीवर स्वाक्षरी देऊन त्यांनी पैसे भरल्याची त्यांच्या बँक खात्यात नोंद न घेता हे पैसे परस्पर पळविल्याचा प्रकार घडला. दरम्यान, शनिवारी काही खातेदार पैसे काढण्यासाठी बँकेत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे बँक प्रशासन चांगलेच हादरून गेले. या प्रकाराची बँकेचे विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे यांच्या पथकाने तपासणी केली. तसेच खातेदारांच्या तक्रारींची तपासणी केली. यामध्ये खातेदारांनी बँकेत पैसे भरलेल्या पावत्या देखील दाखविल्या. या प्रकारानंतर विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे यांनी सोमवारी रात्री उशीरा कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यामध्ये शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, रोखपाल यांनी पदाचा गैरवापर करून खातेदारांच्या रोख रकमा त्यांच्या खात्यात जमा न करता 70 ते 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमुद केले. पोलिसांनी वसंत घुगे, संजय भोयर, गजानन कुलकर्णी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांचे पथक पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी रोखपाल गजानन कुलकर्णी यास ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा