

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा: बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या कळमनुरी शाखेत शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक व रोखपालाने खातेदारांचे चालू खाते, बचत खाते व ठेवी खात्यातील रक्कम परस्पर काढून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. हा प्रकार सोमवारी (दि.१७) उघडकीस आला. याची माहिती मिळताच शेकडो खातेदारांनी बँकेत गर्दी केली. आपल्या खात्यातील रक्कम गायब असल्याचे कळताच ठेवीदार हताश झाले असून पोलिसांनी तक्रार देण्याचे आवाहन (Hingoli News) केले आहे.
कळमनुरी शाखेत (Hingoli News) कार्यरत असलेले व्यवस्थापक वसंतराव घुगे, सहायक शाखा व्यवस्थापक संजय भोयर, रोखपाल गजानन कुलकर्णी यांनी संगनमत करून शेकडो खातेदारांच्या खात्यात अफरातफर करत परस्पर रक्कम उचलली. बँकेतील ठेवीदारांना 2 टक्के व्याजाचे आमिष दाखवत रक्कम रिनीव्हल करताना परस्पर कर्ज उचलले. तर चालू खात्यातील भरणे रक्कमेची रशीद देत पासबुकवर एन्ट्री केली. पण खात्यात रक्कम न जमा करता रक्कम गिळंकृत केली. खातेदारांना पण याचा थांगपत्ता लागू दिला नाही.
दरम्यान, गत आठवड्यात शाखा व्यवस्थापकाची बदली औंढा येथे झाली. व तेथून संदीप लोंढे 23 जूनरोजी रुजू झाले. त्यांना सदर गैरप्रकाराची कुणकुण लागली. त्यांनी वरिष्ठांना सदर बाबीची कल्पना दिली असता बँकेअंतर्गत मागील आठवड्यात चौकशी सुरू झाली. आपले गैरप्रकार उघडकीस झाल्याचे कळताच भोयर, घुगे नॉट रीचेबल झाले. सोमवारी बँकेत काही खातेदारांनी आपल्या खात्याचे तपशील घेता खात्यात रक्कमच नसल्याचे दिसताच, त्यांची तारांबळ उडाली. ही वार्ता शहरभर पसरताच खातेदारांनी बँकेत रक्कम सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी गर्दी केली होती. अनेक खातेदारांना कर्मचार्यांनी चुना लावल्याचे निदर्शनास आले.
अनेक खातेदार ग्रामीण भागातील असून आपल्या मेहनतीचे पैसे ठेवी म्हणून या बँकेत ठेवले होते. ती रक्कम गायब झाल्यामुळे त्यांचे चेहरे हिरमुसले. तर काहींना अश्रु अनावर झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे, पोलीस उपनिरीक्षक शालिनी गजभारे व पोलीस पथक शाखेत दाखल झाले. संतप्त खातेदारांची समजूत घालत फिर्याद देण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.
आमदरीचे शामराव बेले यांनी आपल्या चालू खात्यात १ लाख ८० हजार वेळोवेळी भरणा केले होते. आज खाते तपासले असता ४० हजार रक्कम शिल्लक असल्याचे दिसून आले. संतोष पवार या व्यापाऱ्याने आपल्या खात्यात ९ लाख ८० हजार भरले असताना त्यांच्या खात्यात ४० हजार, तर नितीन डाके यांच्या खात्यातील ४ लाख ८० हजार रुपये आरटीजीएसद्वारे परस्पर उचलले. सध्या त्यांच्या खात्यात फक्त ५ हजार असल्याचे दिसून आले. तर पुयना या गावचे संतोष मस्के यांची १० लाखांची ठेवीवर परस्पर ९ लाखांचे कर्ज उचलण्यात आल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा