

जालना ः प्रभाग क्रमांक 4 मधील रामनगर, भीमनगर, गांधी नगर, आरेफ कॉलनी आदी परिसरातील नागरिक अजून देखील नागरी सुविधेपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. आता जालना महापालिकेच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. या प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या चकरा वाढणार आहे. नागरी समस्यातून कोण मुक्ती करणार, असा सवाल स्थानिक नागरिकांतून उपस्थित केल्या जात आहे.
दरम्यान, या प्रभागातील नागरिकांना नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. घंटागाडी नियमित कचरा उचलण्यास येत नाही. पथदिवे बंद आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिक कचरा रस्त्यावर टाकत असल्याने रस्त्याला उकिरड्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. घाण पसरली आहे. नाल्यातील घाण सुध्दा काढलेली नाही. सर्व कामे तत्काळ करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
समाज सेवक शहेबाज रहिम अन्सारी यांनी ही तक्रार यांच्यासह इतरांनी केली आहे. अंडरग्राउंड नाली करून पाईप टाकाणे अत्यंत गरजेचे आहे. खांबावरील पथदिवे लावण्यात यावेत. आदी मागण्या रहिवाशांच्या आहेत.
प्रभागाला स्वच्छ व सुंदर बनवण्याची आशा - या प्रभागातील रहिवासी नागरी सुविधांपासून वंचित आहे. सर्वत्र दुर्गंधी, बंद पडलेले पथदिवे, उघड्यावरील नाल्या, साचलेला कचरा आदी समस्या उभ्या आहेत. त्या सोडवण्याची जबाबदारी भावी लोकप्रतिनिधींची आहे. प्रभागाला स्वच्छ व सुंदर बनवण्याची रहिवाशांची अपेक्षा आहे.
शहेबाज़ अन्सारी, रहिवासी