

केज : आजीच्या रक्षाविसर्जनासाठी दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर पाठिमागे बसलेल्या त्याचा मित्र जखमी झाला. जखमीवर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी (दि.२३) केज-मांजरसुंबा रस्त्यावरील बरड फाट्याजवळ पहाटे ५:३० च्या सुमारास घडला. अनुप विठ्ठलराव सोनटक्के (वय ३०) असे या तरूणाचे नाव आहे.
अनुप सोनटक्के हा छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा परिसरात कामानिमित्त राहतो. तो बुधवारी पहाटे आजीच्या रक्षा विसर्जनासाठी लातूर जिल्ह्यातील ढोराळा येथे आपल्याला मित्राला घेऊन दुचाकीवरून (एम एच-२०/जी बी-२३६१) येत होता. तो दुचाकीवरून बरड फाट्याजवळ आला असता समोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात टेम्पोने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अनुपचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला मित्रावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे जमादार राजू वंजारे, पोलीस नाईक पाशा शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातानंतर टेम्पो घेऊन टेम्पो चालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.