

yelambghat bus bike accident: नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील येळंबघाट शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वर दिनांक २५/१०/२०२६ रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एसटी बस व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वसई ते अंबाजोगाई ही एसटी बस क्रमांक MH-14-MH-5632 नेकनूरकडून अंबाजोगाईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी यामाहा एफझेड दुचाकी क्रमांक MH-02-BL-0753 ही केज रोडने नेकनूरच्या दिशेने येत असताना येळंबघाट जवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.सदर अपघातात दुचाकीवरील खालील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला राहुल सुरेश काळे, वय अंदाजे २५ वर्षे, रा. येळंबघाट, ता. जि. बीड. आकाश बापू पवार, वय अंदाजे २५ वर्षे, रा. विडा, ता. केज, जि. बीड. अशी त्यांची नावे आहेत.
अपघातातील दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय, नेकनूर येथे हलविण्यात आले .अपघातग्रस्त एसटी बस व दुचाकी ही दोन्ही वाहने नेकनूर पोलीस ठाण्यात आणून जमा करण्यात आली आहेत.