

मांगले : मांगले-वारणानगर मार्गावर अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे मंगल ज्ञानदेव खामकर (वय ६१) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती ज्ञानदेव ऊर्फ बाळासाहेब खामकर (वय ७०) हे जखमी झाले आहेत. रविवारी रात्री सव्वाआठ वाजता शेतातून घरी जात असताना ही घटना घडली.
खामकर कुटुंबीय वारणा नदीवरील मांगले-काखे दरम्यानच्या पुलालगत शेतातील वस्तीवर राहण्यास आहेत. सायंकाळी गावाजवळील शेतातील तोडणी झालेल्या उसाचा फड पेटवण्यासाठी ज्ञानदेव खामकर पत्नी मंगल यांना सोबत घेऊन आले होते. दरम्यान, रात्री काम पूर्ण झाल्यावर दुचाकीवरून ते घरी जात असताना डाग वस्तीजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे पती-पत्नी दोघेही रस्त्यावर पडले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मंगल खामकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती ज्ञानदेव खामकर हे जखमी झाले.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक असल्याने घटनेची माहिती तातडीने समजली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.