

VIP treatment For Karad in jail?, Mla Rohit Pawar makes serious allegations against the police administration
केज, पुढारी वृत्तसेवा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात अस-लेला मुख्य आरोपी वाल्मीक कराड आजही आपल्या गँगमार्फत बाहेरून गुन्हेगारी कारवाया करत आहे. तुरुंगात असूनही त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते काय? असा थेट आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कारागृह आणि पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
रविवारी (दि. २९ जुलै) आ. पवार परळी तालुक्यात भेटीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी स्व. संतोष देशमुख यांच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार सय्यद सलीम, आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, वाल्मीक कराड याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याने संतोष देशमुख यांची निघृण हत्या केली. मात्र आजही त्याची गैंग बाहेर सक्रिय असून, पोलिस यंत्रणेमध्येही त्याला मदत करणारे काही अधिकारी आहेत, हे दुर्दैवी आहे.
अशा पोलीस अधिकाऱ्यांची फक्त तालुक्यांतर्गत नव्हे तर जिल्ह्याबाहेर बदली झाली पाहिजे. एखाद्या गुन्हेगाराला मदत करणारे अधिकारी यंत्रणेला काळिमा फासतात. ते पुढे म्हणाले, सर्व आरोपी एकाच कारागृहात ठेवल्यास त्यांच्यात पुन्हा समन्वय साधून प्रभाव वाढवण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांना वेगवेगळ्या तुरुंगात हलवले पाहिजे.
पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम चांगले काम करत असून आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. या वेळी आ. रोहित पवार यांनी त्याला धीर देत, आपण असं टोकाचं पाऊल उचलू नकोस. आम्ही तुझ्या पाठिशी आहोत. अशा अन्यायाच्या विरोधात सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, असं सांगून मदतीचे आश्वासन दिले.