

Manoj Jarange Patil in the field to get justice for the late Mahadev Munde family
बीड, पुढारी वृत्तसेवा : परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांची अतिशय क्रूरतेने हत्या झाल्यानंतर पोलिसांना अजूनही महादेव मुंडे यांचे मारेकरी सापडत नाहीत. न्याय मिळावा यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा गेल्या अनेक दिवसापासून लढा सुरूच आहे मात्र मुंडे कुटुंबीयांना अजून न्याय मिळालाच नाही. आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हेच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतात.
या विश्वासाने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना हाक दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. स्व. महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभे राहणार आहे.
स्व. महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बीड शहरातील कॅनॉल रोड येथील रामकृष्ण लॉन्स येथे बीड जिल्हा सकळ मराठा समाजाच्या वतीने सर्व धर्मीय व सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरणारा असून महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे. तरी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी माजी खासदार, आमदार, मंत्री, सदस्य, नगरसेवक, सरपंच यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी नागरिक यांनी मोठ्या संख्येने या आयोजित बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाज बीड जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
बीड, पुढारी वृत्तसेवा : परळीतील नामांकित व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला तब्बल २१ महिने उलटले तरीही बीड पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा छडा लागलेला नाही. तपासात सातत्याने अधिकारी बदलले गेले, विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले गेले, पण न्यायाचे दार मात्र अजूनही बंदच आहे. या पार्श्वभूमीवर मृताच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी बुधवारी (दि.३०) मुंबईकडे कुटुंबीयांसह रवाना झाल्या आहेत.
तपास यंत्रणांनी आतापर्यंत सहा ते सात अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी विशेष तपास पथकही तयार केले. तरीही आरोपींचा ठावठिकाणा लागत नसल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. विशेष म्हणजे आरोपी ओळखीचे असूनही पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांचे ठाम म्हणणे आहे.
आज माझ्या पतीच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मला समाज आणि नेत्यांच्या दारात धावावे लागत आहे, ही फार वेदनादायक बाब आहे.
राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बहिणीचे दुःख समजून घेऊन मला न्याय द्यावा, फफअशी भावना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, माझा पती निर्दोषपणे मारला गेला. त्याच्या मारेकऱ्यांना अटक होऊन कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी लढत आहे. आता मुख्यमंत्रीच शेवटचा आशेचा किरण आहेत.