

केज : केज-कळंब रस्त्यावरील सुर्डी फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला भरधाव एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवार, दि. ३० जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. गणेश बंकट अंबिरकर (वय ४५, रा. डिकसळ, ता. कळंब) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अंबिरकर आणि अब्बास शेरखान पठाण (वय ६०, रा. लाखा, ह. मु. कळंब) हे दोघे दुचाकीवरून कळंबहून सुर्डी येथील एका कार्यक्रमासाठी निघाले होते. सुर्डी फाट्यावर ते रस्ता ओलांडून सुर्डी गावाकडे जात असताना, स्वारगेट-वसमत या भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरून खाली पडलेल्या गणेश अंबिरकर यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अब्बास पठाण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नेऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संपत शेंडगे आणि पोलीस नाईक महेश कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.