

धारूर ः प्रहार जनशक्ती पक्षाच्या किल्ले धारूर शाखेच्या वतीने दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन किल्ले धारूर तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आले.
तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना पारदर्शक व प्रभावी कामगिरी केली होती. त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या, पदोन्नती व कंत्राटे मिळवणाऱ्यांवर कठोर कारवाई करत अनेक गैरप्रकार उघडकीस आणले. तसेच दिव्यांगांच्या नावाखाली संस्था व शाळा चालवून होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांवरही त्यांनी आळा घातला.
राज्यभरातील दिव्यांगांच्या नावावर होणाऱ्या विविध घोटाळ्यांचा पर्दाफाश करून गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली होती. मात्र, त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे राज्यभरात नाराजी व्यक्त होत असून सुरू असलेल्या सुधारणा प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दिव्यांग बांधवांच्या हिताच्या दृष्टीने तुकाराम मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस तथा किल्ले धारूरचे हनुमंत तोंडे, उपाध्यक्ष विष्णू चोले, सचिव अशोक इंगोले, सहसचिव जनक पांचाळ, युवा उपाध्यक्ष उतरेश्वर चव्हाण, प्रहार सैनिक नानाभाऊ दराडे, अशोक पाटुळे, प्रविण रिड्डे, निखिल भालेराव, आगंद यादव तसेच आझाद क्रांती सेनेचे बळिराम मस्के, बंडू आंडिल आदी उपस्थित होते.