

नागपूर : "राजकारण आपल्या जागी, पण दादांशी असलेलं माझं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नव्हतं. वेळोवेळी मार्गदर्शन करणारा एक मार्गदर्शक आणि हक्काचा माणूस आज हरपला. मी आज एका पितृतुल्य नेतृत्वाला मुकलो आहे. माझी ही वैयक्तिक हानी शब्दांत मांडणे कठीण आहे. दादाच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची तर हानी झालीच आहे, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली अशी भावना युवा नेते सलील अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.
आज शब्द थांबले…प्रकाश गजभिये
दूरदृष्टी, धाडस आणि प्रशासनाला योग्य दिशा देणारा एक आधारवड कोसळला आहे. दादा, तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी काळ जरी पुढे गेला तरी भरून निघणारी नाही. लोकहितासाठी घेतलेले कठोर निर्णय आणि निर्भीड भूमिका हीच तुमची खरी ओळख राहील.
कधी न भरून निघणारी हानी - रमेशचंद्र बंग
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आणि काळजाला चटका लावून जाणारा आहे. कामाचा अफाट उरक असलेला हा 'लोकनेता' आता आपल्यात नाही.अजितदादांसोबत राज्याच्या विधिमंडळात आणि राजकीय प्रवासात अनेक वर्ष काम करण्याचे भाग्य मला लाभले. राजकारणात मतभेद असूनही त्यांनी वैयक्तिक पातळीवर सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले. सत्तेत असो वा नसो, प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्याला न्याय मिळवून देणे, यात दादांचा हात कुणीच धरू शकत नव्हते. महाराष्ट्राला प्रगत राज्य बनवण्याचे एक स्पष्ट व्हिजन त्यांच्या डोळ्यासमोर होते. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णयांची गती यामुळे राज्याने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले अशी भावना माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी व्यक्त केली.
बुलंद आवाज हरपला ; जयदीप कवाडे
ही घटना एका व्यक्तीच्या निधनापुरती मर्यादित नसून, निर्भिड वक्तृत्व, परखड भूमिका, कणखर नेतृत्व आणि सेक्युलर विचारधारेच्या एका प्रभावी पर्वाचा अस्त असल्याची भावना पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केली आहे.
रा.स्व.संघाच्या भावपूर्ण श्रद्धांजली
अजितदादा पवार हे केवळ सत्ताकेंद्रातील नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सेक्युलर राजकारणाचा बुलंद आवाज होते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, सामाजिक न्याय आणि लोककल्याणाच्या विचारांवर आधारित राजकारण त्यांनी सातत्याने पुढे नेले. जात, धर्म किंवा वर्गभेद न मानता सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवणारी त्यांची भूमिका हीच त्यांच्या राजकारणाची खरी ओळख होती. केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व हरपलेले नाही, तर संकटाच्या काळात समाजाला धीर देणारा, दिशा दाखवणारा आणि निर्णयक्षम नेतृत्व देणारा बुलंद आवाज आपण गमावला आहे.
असा नेता होणे नाही; प्रवीण कुंटे पाटील
महाराष्ट्राचे संघर्षशील लोकनेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची ही मोठी हानी असून, विकासाची दूरदृष्टी असलेला एक रोखठोक लोकनेता आपण गमावला अशी शोकसंवेदना नानासाहेब जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाने राज्यातील जनतेचे व राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवाराचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून असा नेता पुन्हा होणे नाही अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष,प्रदेश प्रवक्ते प्रविण कुंटे पाटील यांनी व्यक्त केली.
प्रशासनाचा वाघ, लोकनेता हरपला...; श्रीकांत शिवणकर
अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक झंझावात शांत झाला आहे. शब्दांत व्यक्त न होणारे हे दुःख आहे. दादांनी नेहमीच कार्यकर्त्याला कुटुंबाप्रमाणे जपले, आज आम्ही आमचा आधार गमावला आहे.दादा, तुमचे विचार आणि तुमची कार्यपद्धती आम्हाला कायम प्रेरणा देत राहील अशी भावना शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी व्यक्त केली.