

परळी ः परळी शहरातील वाहतुकीचा मुख्य दुवा असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर रविवारी सायंकाळी तब्बल एक तास वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. शहरातील विविध भागांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब बनली असून वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. वाढती वाहने, अव्यवस्थित पार्किंग, नियमांचे उल्लंघन आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र शाखा असतानाही कोंडीच्या वेळी पोलीस यंत्रणा वेळेवर सक्रिय होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाहतूक सुरळीत करण्याऐवजी केवळ कारवाई आणि वसुलीपुरतीच यंत्रणा मर्यादित असल्याची नाराजी वाहनचालकांनी व्यक्त केली. कोंडी निर्माण झाल्यानंतरही बराच वेळ कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या तासभराच्या कोंडीमुळे कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल परिसरात कायमस्वरूपी वाहतूक नियोजन, वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती, अतिक्रमणांवर कारवाई आणि पर्यायी मार्गांचा विकास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.