

पणजी : कासवाच्या चालीने दाटीवाटीने चालणारी वाहने, पुढे जाण्यासाठी स्पर्धा करणारी दुचार्कीपासून ट्रेलरपर्यंत सर्वप्रकारची वाहने आणि पुढे जाण्याच्या घाईत अंदाज चुकला, तर अपघात अटळ, असे चित्र अलीकडे मुंबई-गोवा महामार्गावरील पर्वरीमध्ये दररोज दिसते आहे. मांडवी पुलावरून पुढे गेल्यावर एका कॅसिनोसमोरून ही वाहनांची गर्दी सुरू होते, ती थेट अगदी चोगम रोडवरून गिरीतील हायवेवर जाईपर्यंत. सगळ्यात जास्त कोंडीचा त्रास होतो तो मॉल समोरील रस्त्यात.
इथे पणजीहून येणारे दोन रस्ते एकत्र मिळतात, त्यामुळे वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून येणारी वाहने पुलाखालून पणजी व म्हापशाकडे जाण्यासाठी कशाही पद्धतीने आत घुसतात आणि सरळ मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांची दमछाक होते. अपघाताची भीती तर कितीतरी अधिक पटीने वाढते. मॉलकडून ओ कोकिरो सर्कलकडे जाईपर्यंत सर्वच वाहने मुंगीच्या चालीने चालतात. वाहतूक पोलिस अथवा सिग्नल नसल्याने अर्धा अर्धा तास एका ठिकाणी थांबावे लागते. दुचाकी जाण्यासाठीही वाट सापडत नाही. एवढ्याशा रस्त्यात काही ठिकाणी काम सुरू असल्याने रस्ता बॅरल लावून अडवल्याने तो चिंचोळा बनतो आणि त्यातून पुढे जाणे खूपच कठीण बनते.
डिसेंबर अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात येत असले, तरी सद्यस्थितीत या रस्त्याने वाहने हाकणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणेच आहे. अनेक चालक जागा मिळेल तिथे दुचाकी, चारचाकी वाहने घुसवतात आणि अचानक डावी, उजवीकडे आपली वाहने वळवून जाण्याचा प्रयत्न करतात. उजवीकडील वाहन अचानक डाव्या बाजूला आले, तर सगळ्यांनाच ब्रेक मारावा लागतो. यात मागची वाहने येऊन पुढच्या वाहनांना धडकतात. अपघात होतो, बाचाबाची वाढते आणि विनाकारण रस्ता ब्लॉक होतो. त्यासाठी आपल्याला ज्या दिशेला वळायचे आहे, त्या दिशेच्या मार्गिकमध्ये आपले वाहन ठेवणे आवश्यक असते. मात्र, वाहनचालक हा साधा वाहतुकीचा नियम पाळताना दिसत नाहीत.
त्यात पुन्हा काही अंतर्गत रस्ते आहेत, तेही मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यावर सगळेचजण अंतर्गत रस्ते वापरू लागल्याने आता त्या रस्त्यांवरही कोंडी वाढू लागली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळा लक्षात घेऊन पोलिस विभागाने वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
धोकादायक संध्याकाळी सातत्याने होणारी वाहतूक कोंडी अपघात आणि अपघाती मृत्यूंना कारणीभूत ठरू शकते. वाहतूक पोलिस विभागाकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. एखाद्या ठिकाणी गर्दी झाली की कॅमेऱ्यात दिसते आणि मग ती कोंडी दूर करण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागते. पण, गेल्या अनेक दिवसांत सातत्याने वाहतूक कोंडी होऊनही ती सोडवण्यासाठी एकही वाहतूक पोलिस दिसला नाही. त्यामुळे ती यंत्रणा कार्यरत तरी आहे का, अशी शंका अनेकांना वाटते आहे.
'नो पार्किंग'मध्येच पार्किंग
ओ कोकिरो चौकात चोगम रोडच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या बाजूला वाहने थांबवू नयेत यासाठी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, आजुबाजूच्या बिर्याणी हाऊस किंवा हॉटेलमध्ये पार्सल आणण्यासाठी किंवा खाण्यासाठी अनेकजण आपली वाहने रस्त्यावर थांबवून आत जातात. एका बाजूला पार्किंग केलेली वाहने आणि दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांसाठीची मार्गिका असल्यामुळे मथल्या जागेतून वाहने पुढे नेणे कठीण बनते. साहजिकच मोठी वाहने तेथे थांबतात आणि मागे वाहनांची रांग लागते. या चौकातून चक्क मॉल पर्यंत वाहने कोंडीत अडकतात. त्यामुळे बेकायदेशीररित्या वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रवासी व वाहनचालकांची मागणी आहे.
अवजड वाहने ठरताहेत डोकेदुखी
पूर्वी जीआयडीसीमधून येणारी व जाणारी अवजड वाहने रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत सोडली जायची. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची भीती निम्म्यावर आली होती. आता इंडस्ट्रीयल इस्टेटमधून येणारी अवजड वाहने (लांब वाहने, ट्रेलर वैगरे) केव्हाही येत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिक भर पडते. उड्डाणपुलामुळे पर्यायी रस्ते सुरू केले, पण त्यातही अधूनमधून बदलही केला जातो. मात्र, वाहनांची संख्या इतकी वाढली आहे की, रस्तेथ अपुरे पडायला लागले आहेत. वाहतूक पोलिस अथवा सिमल नसल्याने या कोंडीत क्षणोक्षणी भर पडते आहे