Sindhudurg News : कुडाळात वाहतूक कोंडी रोजचीच; डायल १०८ रुग्णवाहिका अडकली!

बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; उपाययोजनेची मागणी
Sindhudurg News
कुडाळात वाहतूक कोंडी रोजचीच; डायल १०८ रुग्णवाहिका अडकली!
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, शनिवारी दुपारी बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली. त्यामुळे रुग्णांनाही अशाप्रकारे वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.

कुडाळ शहरातील पोलिस स्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग या मुख्य रस्त्यावर पोलिस स्टेशन समोर, पोस्ट ऑफिस चौक परिसर, राजमाता जिजाऊ चौक ते बसस्थानक, गांधीचौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यान वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. बुधवार कुडाळचा आठवडा बाजार तसेच अन्य हंगामी काळात ही वाहतूक कोंडीची समस्या रोजचीच झाली आहे. रस्त्यालगत बेशिस्तपणे पार्क केली जाणारी दुचाकी व चारचाकी वाहने, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गाड्या तसेच वाढती वाहनसंख्या यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनधारक, दुचाकीस्वार, पादचारी नागरिक तसेच शालेय मुलांनाही अनेकदा वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागतो.

सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने मुंबईकर चाकरमानी, पर्यटक व प्रवासी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. परिणामी शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढून वारंवार कोंडी निर्माण होत आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानक समोरील गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झाली. एसटी बसेस, मालवाहू वाहने तसेच खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना अनेक मिनिटे जागेवरच थांबून राहावे लागले.

याचवेळी कुडाळ ग्रामीण रुग्णालयातून गंभीर रुग्णाला घेऊन ‘डायल १०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने जात होती. मात्र बसस्थानक समोरील गांधी चौकात ती वाहतूक कोंडीत अडकली. रुग्णवाहिकेचा सायरन सुरू असूनही पुढे जाण्यास मार्ग मिळत नव्हता. काही वाहनचालकांनी वाहने बाजूला घेत मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर रुग्णवाहिकेला मार्ग मिळाला आणि ती पुढे रवाना झाली.

दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस शहरीकरण वाढत असून, शहरातील ही वाहतूक कोंडीची समस्या सुटणार तरी कधी असा सवाल वाहनधारक व नागरिकांतून केला जात आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन, वाहतूक पोलीस तसेच संबंधित विभागांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news