

Thieves terrorize Solapur-Dhule highway Bag stolen from moving car
बीड, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर धुळे महामार्गावर गेवराई ते चौसाळा या दरम्यान चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. जेवणासाठी, चहापाणासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल्सवर चढून बॅग लंपास केल्या जात आहेत. तर रात्री विश्रांतीसाठी रस्त्याच्या बाजूला हॉटेलचा आधार घेवून थांबलेल्या प्रवाशांना शत्राचा धाक दाखवून लुटले जात आहे. असे प्रकार थांबवण्यासाठी आता पोलिस दल अलर्ट मोडवर आले असून गेवराई, बीड ग्रामीण व नेकनूर पोलिसांना पोलिस अधीक्षकांनी विशेष सूचना दिल्या आहेत.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे महामार्गावर गेल्या काही महिन्यांमध्ये लुटमार तसेच ट्रॅव्हल्सवरील बॅग लंपास केल्या जात असल्याच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत गढीनजीक परप्रांतीय प्रवाशांच्या थांबलेल्या गाडीतील महिलांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. तसेच पालीजवळ असलेल्या एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी उभा केल्यानंतर मालकाने ती लॉक केली नव्हती, नेमकी ही संधी साधत चोरट्यांनी गाडीतील बॅग लंपास केली होती.
याबरोबरच ट्रॅव्हल्स चहापाणासाठी अथवा जेवणासाठी रात्री एखाद्या हॉटेलवर थांबल्यानंतर त्यावर चोरटे चढून बसत आहेत. गाडी काही अंतरावर जाताच प्रवाशांच्या बॅग खाली फे कल्या जातात, चढावर अथवा टोलनाक्यावर गाडीची गती कमी होताच हे चोरटे पसार होत आहेत. अशा घटना वारंवार समोर येऊ लागल्याने आता पोलिस अधिक्षक नवनित कावत यांनी गेवराई, बीड ग्रामीण, नेकनूर पोलिसांना विशेष सूचना देत या मार्गावरील गस्त वाढवण्याबरोबरच उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
धूम स्टाईल चोरी सोलापूर-धुळे महामार्गावर चोरी करणारे चोरटे हे दुचाकीचा वापर करत आहेत. एका गाडीवर तिघेजण बसलेले असतात, मध्ये बसलेला चोर ट्रॅव्हल्सच्या जवळ येताच उभा राहतो आणि पाठीमागील शिडीचा आधार घेऊन त्यावर चढतो, त्यानंतर हाताला येतील त्या बॅग खाली टाकून गाडीची गती कमी होण्याची प्रतीक्षा करतो, गाडीची गती कमी होताच खाली उतरुन पसार होतो. तर दुसरीकडे त्याचे साथीदार खाली फेकल्या गेलेल्या बॅग घेऊन पसार होतात.
महामार्गावरील विश्रांती ठरू शकते धोकादायक सोलापूर ते धुळे महामार्गावर अनेक हॉटेल्स ढाबे आहेत, अशा हॉटेल्सपासून काही अंतरावर लोक विश्रांतीसाठी थांबतात. चालकाला झोप आली असेल तर महामार्गाच्या बाजूला काही वेळ गाडी थांबवून झोपही घेतली जाते, अशा गाड्यांनाच हे चोरटे लक्ष्य करत आहेत. त्यामुळे महामार्गावर अशा पद्धतीने थांबणे धोकादायक ठरु शकते.