

The leopard is causing terror; farmers are staying indoors before 5 PM!
उदय नागरगोजे
बीड : जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यात बिबट्या दिसल्याच्या चर्चाना गेल्या काही महिन्यांत ऊत आला आहे. यातच काही भागातून थेट व्हिडीओ व्हायरल झाल्याने या दाव्यांना दुजोरा मिळाला. काही अपवाद वगळता बिबट्याने थेट माणसावर हल्ला केल्याची घटना घडलेली नसली तरी बिबट्याचा वावर वाढल्याने आता अनेक गावांमधील शेतकरी मात्र पाचच्या आत गाव जवळ करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून आष्टीसह पाटोदा, शिरूर व जिल्ह्याच्या काही इतर काही तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. अधुनमधून हा बिबट्या दिसला की त्याचे व्हीडीओ व्हायरल होतात. यामुळे शेतकरी सावध होत असले तरी अफ वांमुळे मात्र भीतीचे वातावरण तयार होते. आता शेतातील कामाचे दिवस असताना बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चामुळे शेतकरी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गाव जवळ करत असल्याचे धामणगाव येथील युवा शेतकरी दिपक शिंगवी यांनी सांगितले.
दिवसा वीज टीकेना; रात्री धाडस होईना!
सध्या शेतीपिकांना पाणी देणे गरजेचे आहे. पाऊस जोरदार झालेला असल्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु आष्टीसह परिसरात बिबट्याची देखील दहशत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी दारे धरायला जाणे मोठे धाडसाचे ठरेल, तर दिवस वीजच जास्तवेळ उपलब्ध राहत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण आहे. दिवसा जेवढा वेळ शक्य होईल तेव्हढा वेळ पाणी दिल्या-शिवाय शेतकऱ्यांसमोर कोणताही पर्याय नाही.
शेत शिवारात फटाक्यांचा आवाज
आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी परिसरात काही वर्षांपूर्वी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे गावकरी नेहमी सतर्क असतात. यातच परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली की शेतकरी महिला-पुरुष अधिकची काळजी घेतात. अचानक एकट्याला शेतात जावे लागले तर शेतात जाताच एकदोन फ टाके वाजवत आवाज करत असतो असे पारगाव जोगेश्वरी येथील शेतकरी तात्यासाहेब कदम यांनी सांगितले.