

The ideal of Anna Bhau Sathe Jayanti in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती शुक्रवार (दि.१) ऑगस्ट रोजी अतिशय उत्स्फूर्तपणे परिवर्तनाने साजरी करण्यात आली. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने चांदणे बाडा येथून अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य साहित्य दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीत महिला आणि पुरुष पांढऱ्या शुभ्र पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. कर्नाटक राज्यातील पारंपरिक वाद्य वादनाने आणि घोषणांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित लाखो जनतेने अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करत त्यांचे विचार स्मरणात ठेवले.
बीड शहरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीमार्फत दि. २८ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान अण्णा भाऊ साठे यांचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचवणारे विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या संपूर्ण महोत्सवाचे मार्गदर्शक अजिंक्य चांदणे, उत्सव समितीचे अध्यक्ष बळीराम गवते आणि सचिव सुनिल पाटोळे यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रेरणादायी आयोजन केले होते.
सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून आयोजित अभिवादन कार्यक्रमास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, आ. संदिप क्षीरसागर, अनिल जगताप, कल्याण आखाडे, उल्हास गिराम, राजेंद्र मस्के, सचिन मुळूक, फारुख पटेल, जयसिंग चुंगडे, अजय सरवदे, सिध्दार्थ शिनगारे, गोपाळ धांडे, प्रेमलताताई चांदणे, उत्तम पवार, अशोक सोन वणे, सुभाष लोणके, यांच्यासह लाखो जनसमुदाय उसळला होता. दरम्यान सायंकाळी बीड शहरातील विविध जयंती उत्सव समित्यांकडून साहित्य सम्म्राट आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
पाचशे महिलांना साड्या वाटप !
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक समतेचे आणि श्रमिक सन्मानाचे प्रतीक ठरलेल्या या दिवशी, शहरातील कष्टकरी, कामगार महिलांना साडी वाटप करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मंजुषा शिंदेंच्या सूरांनी जागवली समतेची जाणीव !
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संगीत रजनीत ख्यातनाम गायिका मंजुषा शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीची मूल्यं, समता, बंधुता आणि न्यायाचे गीतरूप सादर केले. सादरीकरणातून समाज परिवर्तनाचा संदेश जोरकसपणे उमटला. आंबेडकरी सांस्कृतिक आंदोलनाला स्वरांची ताकद लाभली, अशी भावना उपस्थितांमध्ये उमटली.
साहित्य रथाने वेधले लक्ष
साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त निघालेल्या साहित्य दिंडीत सजविण्यात आलेल्या साहित्य रथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 'फकिरा' कादंबरीसह अण्णा भाऊंच्या अन्य ग्रंथरचनांनी रथाची साहित्यिक ओळख अधोरेखित केली, तर पृथ्वी ही श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे हा संदेश सादरीकरणातून प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. याचबरोबर कर्नाटक वाद्यांच्या सादरीकरणामुळे या दिंडीला सांस्कृतिक वैशिष्ट्याची लय मिळाली. लोकशाहीर अण्णा भाऊंच्या विचारांची झलक आणि श्रमिकांचे प्रतिनिधित्व करणारी कलात्मक मांडणी ही या रथाची खरी ओळख ठरली.