

The crossing gate has to be closed by stopping the train
बीड, पुढारी वृत्तसेवा : मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या अहिल्यानगर ते बीड रेल्वेसेवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू झाली. परंतु या से-वेतील अडचणी आता समोर येत आहेत. बीड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या चहाटा रोडवरील उभारलेला पूल दिशा चुकल्याने पाडण्यात आला होता, आता या ठिकाणच्या रेल्वे क्रॉसिंगवर कर्मचारी नियुक्त नसल्याने चक्क रेल्वे थांबवून चालक खाली उतरतो आणि फाटक बंद करून पुन्हा रेल्वे पुढे घेऊन जातो. या सर्व प्रकाराची मोठी चर्चा होत असून ही परिस्थिती बदलण्यासाठी रेल्वे विभागानेच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
अहिल्यानगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग बीडकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वेमार्गाच्या पूर्ततेसाठी बीडकरांनी संघर्ष केलेला आहे. केंद्र व राज्य सरकारने मिळून निधी दिल्याने या रेल्वेमार्गाचे बीडपर्यंतचे काम पूर्ण हाऊन काही महिन्यांपूर्वी सेवा देखील सुरू झाली परंतु यातील एक-एक अडचणी आता समोर येऊ लागल्या आहेत.
बीडच्या रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या चहाटा रोडवर वाहतुकीसाठी पुल उभारण्यात आला होता, परंतु तो चुकीच्या दिशेने उभारण्यात आल्याने पाडण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली होती. रेल्वे सेवा सुरू होण्याआधीच कोट्यवधी रुपयांचा उभारलेला हा पूल पाडण्यात येऊन या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगसाठी फाटक लावण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेल्वेसेवेचा शुभारंभ देखील करण्यात आला. परंतु पुरेसे कर्मचारी या रेल्वेसेवेसाठी नियुक्त करण्यात आलेले नाहीत. तसेच रेल्वे सेवा ही डिझेल इंजिनद्वारेच सुरू आहे. यातच चहाटा रोडवरील रेल्वे क्रॉसिंगला रेल्वे येण्यापूर्वी फाटक बंद करण्यासाठी कर्मचारीच नियुक्त नसल्याने अडचणी येत आहेत.
या क्रॉसिंगवर आल्यानंतर वाहने थांबून रेल्वे सरळ जाणे अपेक्षित आहे, परंतु रेल्वे काही अंतरावर थांबवून चालकाला खाली उतरून हे फाटक बंद करावे लागते, त्यानंतर क्रॉसिंगवरुन रेल्वे पुढे गेल्यानंतर पुन्हा फाटक खुले करून रेल्वे पुढे न्यावी लागते, या सर्व प्रकाराची मोठी चर्चा होत असून यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
वडवणीपर्यंतचे काम पूर्ण!
अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचे काम वडवणीपर्यंत पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी वडवणीपर्यंतची रेल्वे इंजिन चाचणीही करण्यात आली. बीडपर्यंतची सेवा सुरू झालेली आहे, आता वडवणीपर्यंतची सेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असून या सेवेत सातत्य तसेच पुरेसे कर्मचारी नियुक्त व्हायला हवेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.
इतर ठिकाणी वाहने थांबतात, बीडमध्ये मात्र रेल्वे थांबते !
ज्या ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे त्या त्या ठिकाणी वाहने थांबवून रेल्वेला मार्ग करुन दिला जातो. परंतु बीडचा पॅटर्नच वेगळा आहे, या ठिकाणी रेल्वेला आधी थांबावे लागते, वाहने गेल्यानंतर रेल्वे फाटक बंद केले जाते आणि मग रेल्वे जाते, या सर्व प्रकाराचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून यावर जोरदार चर्चा होत आहे.