

गौतम बचुटे
केज :- बोगस ट्रस्टच्या नावाने करोडोंचा निधी जमा करून तो निधी देशात आतंकवाद माजविणाऱ्या दहशतवादी संघटनेला पुरविणाऱ्या बोगस ट्रस्टच्या सचिवाला केज पोलिसांनी केज येथील त्याच्या घरातून ताब्यात घेत त्याला एटीएस च्या ताब्यात दिल्याने दहशतवादी संघटनेचे केज कनेक्शन उघड झाल्याने खळबळ माजली आहे. तर केज पोलिसांनी आरोपीला अलगद ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्याने केज पोलिसांचे कौतुक होत आहे.
दि. ८ जानेवारी रोजी दुपारी केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून एक संदेश आला की, एटीएसचा वॉन्टेड असलेला गुलजार-ए- रजा या बोगस ट्रस्टच्या नावावर ट्रस्टच्या नावाने खाते खोलून करोडो रुपयाचा निधी जमा करून तो निधी देशविघातक दहशतवादी संघटनेला पुरविणारा आणि दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला संशय असलेला आरोपी केज येथे आहे. ही माहिती मिळताच केज पोलिस सतर्क झाले.
केज पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सर्व यंत्रणा कामाला लावली. तसेच याची कुणाला सुद्धा कुणकुण लागू नये किंवा चर्चा होऊ नये आणि त्यामुळे दहशतवादी संघटनेशी संपर्कात असलेला आरोपी फरार होऊ नये याची अत्यंत गोपनीय आणि काळजीपूर्वक दक्षता घेतली. दुपारी ३:०० च्या सुमारास कोणाला शंका येऊ नये म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, त्रिंबक सोपने यांनी साध्या वेशात जाऊन केज येथील ख्वाजा बाबा दर्गा शेजारी असलेल्या संशयित आरोपी अहमदुद्दीन कैसर काजी त्याच्या घरावर पाळत ठेवली. संशयित आरोपी अहमदुद्दीन कैसर काजी हा घराच्या बाहेर येताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांनी अलगद अहमदुद्दीन कैसर काजी याच्या मुसक्या आवळल्या.
कुणालाच थांगपत्ता लागू दिला नाही
आरोपी ताब्यात घेतल्या नंतर सुद्धा याची कुणालाच कुण कुण न लागू देता. केज पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, सिद्दिकी शहा आणि नितीन जाधव या पोलिस अधिकाऱ्यांनी एका वाहनातून अहमदुद्दीन कैसर काजी याला धारूर येथे नेऊन एटीएस पथकाच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे केजचे दहशतवादी कनेक्शन असल्याचे उघड झाले; तर केज पोलिसांनी दहशतवाद्यांशी संपर्कात असलेल्या एका तरुणाच्या मुसक्या आवळल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
अहमदुद्दीन कैसर काजीला कसे घेतले ताब्यात ?
अहमदुद्दीन कैसर काजी हा त्याच्या केज येथील घरात असल्याची माहिती मिळाल्या नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, त्रिंबक सोपने यांनी साध्या वेशात त्याच्या घराच्या आजूबाजूला पाळत ठेवली. तसेच घरात जाण्या येण्याच्या रस्त्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले आणि शेजारी पाजारी यांना पण लक्षात येऊ दिले नाही. त्या नंतर पोलिस पथकातील एकाने त्याला कल्पना न येऊ देता त्याला गाफील ठेवले आणि सहज हाक मारली. त्याने हाकेला प्रतिसाद देत तो जसा घरा बाहेर आला तसा घरा बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात घेऊन आले.
पात्रुड येथून ही चौघांना एटीएसने घेतले ताब्यात
केज पोलिसांनी अहमदुद्दीन कैसर काजी याला ताब्यात घेतले. तर माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथून इमरान कलीम शेख, मुज्जमिल नूर सय्यद, अहमदुद्दीन सत्तार काजी आणि तौफिक जावेद काजी या चार संशयित आणि अहमदुद्दीन कैसर काजी या पाच आरोपीना ताब्यात घेतले आहे.
काय आहे यांचे दहशतवादाशी कनेक्शन ?
अहमदुद्दीन कैसर काजी, इमरान कलीम शेख, मुज्जमिल नूर सय्यद, अहमदुद्दीन सत्तार काजी आणि तौफिक जावेद काजी यांनी गुलजार-ए- रजा या बोगस ट्रस्टच्या नावावर ट्रस्टच्या नावाने, बोगस बँक खाते खोलून त्या खात्यात करोडो रुपयाचा निधी जमा केला आहे. त्या निधीचा गैरवापर करून तो निधी देशात आतंकवाद व अशांतता निर्माण करून देशविघातक कृत्य करणाऱ्या देशद्रोही संघटनाना आर्थिक पुरवठा करीत असल्याचा संशय ताब्यात घेतलेल्या आरोपीवर आहे.
कोण आहे अहमदुद्दीन केसर काजी ?
अहमदुद्दीन केसर काजी काजी हा केज येथील ख्वाजा बाबा दर्गा येथे राहत आहे. त्याचे वय ३८ वर्ष असून तो गुलजार-ए- रजा या बोगस ट्रस्टच्या नावाने खाते खोलून करोडो रुपयाचा निधी जमा करून तो निधी देशविघातक दहशतवादी संघटनेला पुरविणाऱ्या त्या बोगस ट्रस्टचा सचिव आहे. तो एटीएसच्या पथकाला वॉन्टेड होता.