

आष्टी : पुढारी वृत्तसेवा
“जिथे कुसळही उगवत नाही, तिथे शेती होऊ शकत नाही,” असा समज आजही अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द (मेहेकरी) येथील शेतकरी नानासाहेब गव्हाणे आणि मंदाकिनी गव्हाणे या पती-पत्नीने हा समज पूर्णपणे चुकीचा ठरवून दाखवला आहे. मुरमाड, नापीक आणि उजाड माळरानावर त्यांनी सेंद्रिय पद्धतीने भोपळा पिकवत नंदनवन फुलवले असून आज त्यांच्या मेहेकरीच्या भोपळ्याला महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांत मोठी मागणी आहे.
गेल्या २४ वर्षांपासून गव्हाणे दांपत्य सेंद्रिय शेती करत आहे. घरीच निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क तयार करून कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा विषारी कीटकनाशकांचा वापर न करता ते वर्षातून तीन वेळा भोपळ्याचे पीक घेतात. गव्हाणे कुटुंबाकडे एकूण १२ एकर शेती असून त्यातील २ एकर क्षेत्रात ८ बाय २ फूट अंतरावर भोपळ्याची लागवड केली जाते. कमी खर्चात आणि कमी कालावधीत ते एकरी १५ ते २० टन उत्पादन घेत असल्याने त्यांचे मॉडेल शेतीसाठी आदर्श ठरत आहे.
या पद्धतीमुळे गव्हाणे कुटुंबाला वर्षातून तीन हंगाम घेऊन ६ ते ७ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे, ही शेती पूर्णतः सेंद्रिय असल्याने उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते आणि बाजारात त्यांच्या भोपळ्याला चांगला दर मिळतो. आज बाजारात रासायनिक फवारण्या केलेल्या भाज्यांमुळे नागरिकांना विविध आजार जडताना दिसत असताना, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भोपळ्याला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात आहे.
मेहेकरीचा हा भोपळा हलवा, पेठा, भाजी तसेच प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. चव, टिकाऊपणा आणि नैसर्गिक गोडी यामुळे व्यापाऱ्यांमध्ये या भोपळ्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेपलीकडे जाऊन परराज्यातूनही थेट मागणी येत असल्याचे नानासाहेब गव्हाणे सांगतात.
शेतीतील अनुभव केवळ स्वतःपुरता न ठेवता इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आदर्श उपक्रमही गव्हाणे दांपत्याने हाती घेतला आहे. २८ डिसेंबर २०२५ रोजी मेहेकरी येथे आष्टी तालुक्यातील ३५ गावांतील शेतकऱ्यांसाठी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ३५० शेतकरी आणि ७० महिला उपस्थित होत्या. यावेळी नानासाहेब गव्हाणे यांनी भोपळा लागवड, सेंद्रिय पद्धती, खर्च नियोजन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मंदाकिनी गव्हाणे आपल्या आयुष्यातील एक आठवण सांगताना भावूक होतात. “शाळेत असताना काही विषयांत मला ‘भोपळा मार्क’ पडायचे, पण आज याच भोपळ्याच्या शेतीतून मी उजाड माळरानावर सोनं पिकवलं,” असे त्या अभिमानाने सांगतात. त्यांच्या या प्रवासाने अनेक महिलांना आणि शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.
पारंपरिक पिकांपुरते मर्यादित न राहता आधुनिक, शाश्वत आणि सेंद्रिय शेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते, असा ठाम विश्वास गव्हाणे दांपत्य व्यक्त करते. शेतीत नावीन्य, मेहनत आणि योग्य नियोजन असेल, तर शेतकऱ्यांचे चांगले दिवस दूर नाहीत आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या निश्चितच थांबू शकतात, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.