

Suspicion of fraud in sorghum procurement
माजलगाव पुढारी वृत्तसेवा माजलगाव येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या ज्वारीची व शेतकऱ्यांची माहिती देण्यास जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहितीच्या अधिकारात अर्ज करून शुल्क भरूनही संबंधित माहिती न दिल्याने या खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय बळावला आहे.
काही महिन्यांपूर्वी माजलगाव येथे शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. नियमाप्रमाणे हे केंद्र शहराजवळ सुरू व्हायला हवे होते; मात्र केंद्र चालकाने ते सावरगावजवळ, मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर सुरू केले. मुख्य रस्त्यावर कुठलाही फलक नसल्याने शेतकऱ्यांना केंद्र शोधणे कठीण गेले. त्यात केंद्र चालकाने शेतकऱ्यांना याची योग्य माहिती न दिल्याने सुरुवातीपासूनच शंका निर्माण झाली होती.
खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही न बसवणे, ग्रेडरशिवाय ज्वारी खरेदी करणे, तसेच शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ज्वारी खरेदी झाल्याचे चित्र उघड झाल्यानंतर हे केंद्र बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग नाटकर यांनी २३ जुलै रोजी जिल्हा पणन कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करून शेतकऱ्यांची नावे, त्यांचे क्षेत्रफळ, ई-पीक नोंदणी व खरेदीची संपूर्ण माहिती मागवली होती. १२ ऑगस्ट रोजी जिल्हा पणन कार्यालयाने त्यांना झेरॉक्स शुल्क भरण्याचे पत्र पाठवले. नाटकर यांनी तात्काळ पैसे भरले; मात्र २२ ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा पत्र पाठवून वैयक्तिक माहिती देता येणार नाही असे कारण देत माहिती नाकारण्यात आली.
या टाळाटाळीवर पांडुरंग नाटकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. शुल्क घेतल्यानंतर माहिती नाकारणे हा नियमभंग असून, जिल्हा पणन अधिकारी व केंद्र चालक यांच्यात संगनमत असल्याचे स्पष्ट दिसते. यामागे मोठा गैरव्यवहार लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे ज्वारी खरेदी प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.