

Ganesha made from bicycle parts
अतुल शिनगारे
धारूर : कसबा भागातील मठ गल्ली येथील जय किसान गणेश मंडळाने यंदा पर्यावरणपूरकतेला वेगळाच आयाम दिला आहे. जुन्या सायकलचे चाक, चेन कव्हर, सीट, ब्रेक कांड्या, पैंडल, चेन आदी टाकाऊ भाग एकत्र करून आकर्षक गणेशमूर्तीची निर्मिती करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी भव्य मिरवणुकीनंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या मंडळाची ओळखच पर्यावरणपूरक गणेश मंडळ अशी आहे. मागील ६१ वर्षांपासून गणेश-ोत्सव साजरा केला जात असून दरवर्षी काहीतरी वेगळं आणि समाजोपयोगी करण्याचा ध्यास या मंडळाने घेतला आहे. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सातत्याने पारितोषिक मिळवणाऱ्या या मंडळाने यापूर्वी पशुधन शिबीर, वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पाणी बचत जनजागृती, सेंद्रिय शेतीचे प्रदर्शन, टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शन असे अनेक उपक्रम राबवले आहेत. यंदा सन्मान नारी शक्तीचा या संकल्पनेतून मंडळाने महिलांची कार्यकारणी जाहीर केली. अध्यक्षपदी ज्योती जगताप यांची निवड करण्यात आली असून त्यांनी सर्व जबाबदारी समर्थपणे स्वीकारली आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
मागील काही वर्षांपासून आम्ही पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची परंपरा जपली आहे. यंदा महिलांना जबाबदारी देऊन जुन्या सायकलच्या टाकाऊ साहित्यापासून गणेशाची मूर्ती तयार केली. त्याचबरोबर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, हुंडाबळी आणि बालविवाह यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती उपक्रम आयोजित करणार आहोत असे अध्यक्षा ज्योती जगताप यांनी सांगितले.