

Sunetra Pawar: The Beed-Pune railway service marks the beginning of transformation
बीड, पुढारी वृत्तसेवा: अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या 'बीड-पुणे' थेट रेल्वेसेवेचा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शानदार शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी बीड ते पुणे रेल्वेसेवा ही परिवर्तनाची सुरुवात असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील 'पंढरी' येथील विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजनही मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित या लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय पातळीवर उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे प्रामुख्याने उपस्थित होते. बीड जिल्हा अनेक दशके रेल्वे नकाशापासून दूर असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून आज सुरू झालेल्या या थेट रेल्वेसेवेमुळे बीडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्वप्नांना उजाळा दिला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी रेल्वे जोडणीला नेहमीच प्राधान्य दिले होते. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना, पुढील वर्षी बीडकरांना थेट पुण्यापर्यंत प्रवास करता येईल, असा शब्द देण्यात आला होता.
आज तोच शब्द पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून मला विशेष अभिमान वाटत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच, येत्या काही महिन्यांत बीड ते पनवेल ही थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त करत, बीड-परळी मार्ग पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग थेट दक्षिण भारताशी जोडला जाईल आणि त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रेल्वेच्या शुभारंभासोबतच बीड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ आज रोवली गेली. बीडच्या स्थानिक कलाकारांसाठी अनेक दशकांपासून हक्काचे व्यासपीठ असलेल्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी 8 कोटी 19 लाख रुपयांचा निधी प्रशासकीय पातळीवर मंजूर करण्यात आला असून, जुन्या भिंती कायम ठेवत येथे अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, साउंड इकोस्टिक, सेंट्रल एसी, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक ग्रीन रूम्स उभारण्यात येणार आहेत.
यासोबतच, धानोरा रस्त्यावरील पंढरी येथे सुमारे 28 कोटी रुपये खर्चाचे भव्य तारांगण व विज्ञान उद्यान उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत 14 कोटी रुपयांना मंजुरी मिळाली असून, या ठिकाणी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.
पंकजा मुंडे, आ. धनंजय मुंडेंची अनुपस्थिती
बीड ते पुणे रेल्वेच्या शुभारंभकार्यक्रमास मंत्री पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे हे उपस्थित राहिले नाहीत. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी नगर-बीड-परळी रेल्वेसाठी मोठे परिश्रम घेतले होते. गतवर्षी बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेच्या शुभारंभावेळी हे दोघे उपस्थित होते. परंतु गुरुवारी झालेल्या कार्यक्रमास मात्र दोघेही अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण समोर आले नसले तरी याबाबत उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होत होती.