

Sugarcane price agitation ignites, warning to sugar millers by burning tires in villages
बीड, पुढारी वृत्तसेवा : ऊसदराच्या प्रश्नावर सर्वच शेतकरी संघटना एकवटून आल्या असून सोमवार दि २४ रोजी होणाऱ्या बेमुदत चक्काजाम आंदोलनाचा इशारा म्हणून जिल्ह्यातील जवळपास १०० गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी टायर जाळून ऊस कारखानदारांना चक्काजाम आंदोलनात सामील असल्याबाबत इशारा दिला आहे. यावेळी ऊस दर व इतर मागण्या संदर्भात घोषणाबाजी करण्यात आली.
ऊस दरबाबत अखिल भारतीय किसान सभा, युवा शेतकरी संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, प्रहार अशा विविध चळ-वळीतील कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कामगार, मुकदम, वाहतूक ठेकेदार एकत्र झाले असून जिल्ह्यातील ऊस दर प्रश्न चिघळला आहे. सोमवार दि २४ रोजी जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी बेमुदत चक्काजाम आंदोलन होणार आहे.
या आंदोलनाची तीव्रता दर्शविण्यासाठी रविवार दि. २३ रोजी जिल्हयातील गावागावात टायर जाळून ऊस दर बाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. ऊस कारखानदाराशी चर्चाकरून प्रश्न मार्गी लावण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला होता मात्र त्याला प्रशासन आणि साखर कारखानदारांनी प्रतिसाद न देऊन ती संधी गमावली तेव्हा आपल्या घामाच्या दामासाठी होणाऱ्या या लढाईत ऊस उत्पादक शेतकरी, शेतकरी पुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जिल्ह्यातील गावागावात टायर जाळून केलेले आंदोलन हे प्रशासन आणि साखर कारखानदारांना सूचक इशारा दिला आहे.
रविवार, दि. २४ रोजी होणारे बेमुदत चक्काजाम आंदोलनात शोषणाविरुद्ध आवाज बुलंद करून रास्त हमीभाव पदरात पाडून घेण्यासाठी यावे, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.