

गौतम बचुटे
केज : केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील एका महिला उपसरपंच या गावासाठी खोदलेल्या पाणी पुरवठ्याच्या वितिरीतील पाण्याचा वापर हा स्वतःसह नातेवाईकांची शेतीसाठी वापरत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी अंतर्गत असलेल्या सारूकवाडी येथे नदीच्या बुडीत क्षेत्रात मनरेगा योजने अंतर्गत सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर खोदलेली आहे. मात्र या विहीरीतिल पाण्याचा वापर हा जल जीवन मिशन योजने अंतर्गत केलेल्या पाईप लाइनद्वारे महिला उपसरपंच गीता धीरज वनवे या त्यांच्या शेतीसाठी करीत आहेत; पण त्याच बरोबर त्यांच्या नातेवाईकांच्या शेतीसाठी देखील याच विहिरीचे पाणी वापरत आहेत. सदर प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य बळीराम इंगळे आणि बालाजी राऊत यांनी गटविकास अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची हानी किंवा अपव्यय व दुरुपयोग केल्यास सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ नुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
या बाबत आम्हाला निवेदन प्राप्त झाले आहे. सदर प्रकरणी चौकशी करून या पाण्याचा वापर थांबविणे बाबत त्यांना नोटीस देण्यात येणार आहे.
सुरेश खाडप, ग्रामविकास अधिकारी