

Situation during Uddhav Thackeray's visit; Lack of coordination among office bearers
बीड, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी बीड तालुक्यातील पाली येथे शेतकरी संवाद मेळाव्यासाठी आले होते. परंतु या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांतील समन्वयाच्या अभावाचा फटका बसलेला दिसला. या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलिसांची संख्या शेतकऱ्यांपेक्षा अधिक होती. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या संवाद दौऱ्याकडे शेतकऱ्यांनीच पाठ फिरवल्याची चर्चा होत होती.
मराठवाड्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. त्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले होते. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेल्या मदतीची आठवण करत पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून हवे आहात अशा भावना देखील बोलून दाखवल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आले.
यावेळी मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या अभावाची झलक पहायला मिळाली. पाली सारख्या मोठ्या गावात शंभर शेतकरी देखील या संवाद मेळाव्यास उपस्थित नव्हते. सकाळपासूनच या ठिकाणी पदाधिकारी दाखल झाले होते, शेतकरी जमवण्यासाठी ते प्रयत्न करत होते, परंतु शेतकरी मात्र या ठिकाणाकडेच फिरकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
या दरम्यानच माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले असता त्यांना मंडप रिकामा दिसताच त्यांनी माणसं बोलवा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या, परंतु एककमेकांकडे बोट दाखवत कोणीही शेतकरी आणण्यासाठी मेहनत घेतली नाही.
यानंतर अवघ्या पंधरा मिनीटात स्वतः उद्धव ठाकरे त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी दानवे यांनी कोणीही पदाधिकारी भाषण करणार नाही, असे सांगत होते. परंतु तरी देखील पदाधिकारीच शेतकरी म्हणून बोलत होते. उद्धव ठाकरे हे सरकारने केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली का, त्यांचे आणखी काय प्रश्न आहेत, त्यांच्या सोडणूकीसाठी सरकारला इशारा द्यायचा म्हणून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांच्यासमोर बीडमध्ये पदाधिकाऱ्यांचीच भाषणे झाल्याने याची आता चर्चा होऊ लागली आहे.