

गौतम बचुटे,केज: तालुक्यात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन युवकाला दोघांनी मोटारसायकलवरून शेतात नेले आणि तेथे चौघांनी मिळून त्याला लोखंडी रॉड व चपलेने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्याला माफी मागायला लावून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील एकुरका येथील उमेश अशोक कोकाटे (वय १७) हा युवक सारणी (सांगवी) येथील विठ्ठल विद्यालय सारणी येथे अकरावी कला शाखेत शिक्षण घेत आहे. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता, उमेश आणि त्याची आई घरी असताना, त्यांच्या गावातील ओळखीचे सचिन अभिमान मोरे आणि गणेश तुळशिराम मोरे हे दोघे मोटारसायकलवरून त्याच्या घरी आले. त्यांनी उमेशला "पेंडीचे पोते आणायचे आहे, तू आमच्यासोबत चल" असे म्हटले. उमेशने त्यांना नकार दिला असता, त्यांनी त्याच्याशी ओढाओढी सुरू केली.
उमेशची आई तिथे आली आणि तिने "तुम्ही त्याच्यासोबत अशी झटापट का करता?" असे विचारताच, त्या दोघांनी उमेशच्या आईला ढकलून दिले, ज्यामुळे त्या खाली पडल्या आणि त्यांचे कपडे फाटले. त्यानंतर त्यांनी उमेशला, "तुझे वडील आमच्या शेतात आहेत, तेथे एक काम आहे, तू आमच्यासोबत चल" असे सांगितले आणि बळजबरीने त्याला मोटारसायकलवर दोघांच्यामध्ये बसवून शेतात घेऊन गेले.
शेतात पोहोचल्यानंतर सचिन मोरेने गाडी थांबवताच उमेशला गाडीवरून ढकलून दिले. उमेश खाली पडताच त्या दोघांनी त्याला अभिमान मोरे आणि तुळशिराम मोरे (दोघेही रा. एकुरका) यांच्यासमोर नेले. या चौघांनी मिळून उमेशला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तुळशिराम मोरे याने सचिन मोरेच्या हातातील लोखंडी रॉड आणि चपलेने त्याला बेदम मारहाण केली. तसेच, त्या चौघांनी मिळून उमेशला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली.
उमेश कोकाटे याने एका मुलीला मोबाईलवरून मेसेज केल्याच्या संशयातून त्याला ही बेदम मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण केल्यानंतर माफी मागायला लावून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करण्यात आला. असा उल्लेख तक्रारीत असून, तो व्हिडिओ अद्याप माध्यमांच्या हाती आलेला नाही. सचिन मोरे, अभिमान मोरे, गणेश मोरे आणि तुळशिराम मोरे या चौघांनी उमेशला लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने आणि चपलेने मारहाण केल्यानंतर उमेश बेशुद्ध पडला. यानंतर, घाबरून त्यांनी उमेशचे वडील अशोक कोकाटे यांना फोन करून बोलावून घेतले आणि त्याला वडिलांच्या ताब्यात दिले.
चौघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी उमेश कोकाटे याने ४ नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, सचिन अभिमान मोरे, गणेश तुळशिराम मोरे, अभिमान मच्छिंद्र मोरे आणि तुळशिराम केशव मोरे (सर्व रा. एकुरका, ता. केज) यांच्याविरुद्ध गु. र. नं. ६०८/२०२५ नुसार ॲट्रॉसिटी कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्ही ए) सह भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.