

Uddhav Thackeray: The government did not give a package but betrayed
बीड, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारकडून नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यात आलेलं सर्वात मोठे पॅकेज नाही तर शेतकऱ्यांना दिलेला आजवरचा सर्वात मोठा दगा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती दिली पाहिजे असे म्हणत ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कुठलाही अभ्यास न करता दोन लाखाचे कर्जमाफी केल्याची आठवण सरकारला करून दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बीड तालुक्यातील पाली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या. या संवाद मेळाव्यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह बीडमधील पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले, मी खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलो आहे. कधीही कोसळली नाही अशी आपत्ती मराठवाड्यावर कोसळली असून आसमानी म्हणजे नैसर्गिक संकट आणि सुलतानी म्हणजे इथल्या कारभाऱ्यांचे संकट आहे.
शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना मी कुठलाही अभ्यास न करता दोन लाखापर्यंत कर्ज माफ केल्याची आठवण त्यांनी सरकारला करून दिली. बँकांचा फायदा होऊ न देता जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार हे देखील सांगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढला आहे.असे असल्यास शेतकऱ्यांनी खरीपाचे हप्ते कसे भरायचे, हप्ते न भरल्यास पुन्हा कर्ज भेटणार की नाही हे देखील अस्पष्ट असल्याने शेतकरी पुन्हा संकटात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसामुळे जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचे पिक सडून गेले आहे. बच्चू कडूंनी आंदोलन केलं त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं आणि कोपराला गुळ लावून सोडून दिलं. तो गुळ दिसतही नाही आणि खाताही येत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार दगाबाज असेल तर सरकारला दग्यानेच मारल पाहिजे. जिल्हा परिषद निवडणुका लावायची सरकारमध्ये धमक नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी प्रचाराला आलेल्या नेत्याला कर्जमुक्ती मागा ती निवडणुकीच्या आधी केली तरच तुम्हाला मत देऊन नाहीतर नाही असं खडसावून सांगा असे ठाकरे यावेळी म्हणाले.कर्जमाफी नाही दिल्यास रस्त्यावर उचलून चक्काजाम करू असा ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला.