

बीड : पुढारी वृत्तसेवा
खासदार सुप्रिया सुळे आज सकाळी मस्साजोग या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी वैभवी देशमुख यांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. यावेळी देशमुख कुटुंबीय भावुक झाले. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचीही सुप्रिया सुळे भेट घेणार आहेत. गावकऱ्यांनीही गावात भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर हे उपस्थित आहेत. या सर्वांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.
६९ दिवसानंतरही न्याय मिळत नाही हे दुर्देवी आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. अमित शहा यांची या प्रकरणी आठ दिवसांपूर्वी मी भेट घेतली होती. त्यांना आम्ही न्यायाची मागणी केली तेंव्हा त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. पैशांच्या आणि सत्तेच्या बळावर वाल्मिक कराडची मस्ती सुरू आहे. प्रशासनाकडून प्रत्येक दिवसाच्या कारवाईचा आम्ही आढावा घेणार आहे असे त्यांनी सांगितले.
आमचा फोन ट्रॅप होतो, कृष्णा आंधळेचा फोन का ट्रॅप होत नाही? कृष्णा आंधळेच्या फोनचा सीडीआर मिळालाच पाहिजे. प्रशासन काय करतंय? फडणवीसांना विचारणार. तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासावेत अशी त्यांनी मागणी केली. देशमुख हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींचे सीडीआर मिळायला पाहिजेत. लोकप्रतिनिधी या नात्याने हा लढा लढणार. यावेळी गावकऱ्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत रोज आंदोलन करणार. अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यावर तुमचा लढा आम्ही लढणार तुम्ही अन्नत्याग करू नका अस सुप्रिया सुळे यांनी गावकऱ्यांना आवाहन केले.