

Repair the dams damaged by excessive rainfall immediately: Former MLA Bhimrao Dhonde
कडा, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव, आनंदवाडी, रुई-नालकोल व नांदा येथील बंधारे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर बाधित व पूर्णतः जीर्ण झाले आहेत. या बंधाऱ्यांच्या दुरवस्थेमुळे परिसरातील शेती, पाणी साठवण आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बंधाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी तहसीलदार तसेच मृदा व जलसंधारण उपविभाग आष्टी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात माजी आमदार धोंडे यांनी नमूद केले आहे की, बंधाऱ्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. या बंधाऱ्यांची दुरुस्ती बाबत उपविभागीय अधिकारी, मृदा व जलसंधारण उपविभाग आष्टी कार्यालयाकडून अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
वारंवार लक्ष वेधूनही प्रशासकीय स्तरावर उदासीनता दिसून येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करून येत्या दोन दिवसांत, म्हणजे दि.५ जानेवारी २०२६ पर्यंत बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू करावे, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जर दिलेल्या मुदतीत कामाला सुरुवात झाली नाही, तर मंगळवार दि.६ जानेवारी २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या प्रश्नाकडे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शेतीविषयक मूलभूत विकासकामांकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने तत्काळ पावले उचलून बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. प्रशासन या मागणीवर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.