

Remove encroachments on national highway: MP Bajrang Sonawane
बीड, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात विविध रस्त्यावर ब्लॅकस्पॉट आहेत. शिवाय राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमणे वाढत आहेत. यामुळे अपघात होत असून अपघात टाळण्यासाठी अतिक्रमणे काढा आणि अपघातस्थळी तातडीने रूग्णवाहिका पाठवा, अशा सुचना खा. बजरंग सोनवणे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजीत केली होती. यावेळी खा. बजरंग सोनवणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान आणि विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. बजरंग सोनवणे म्हणाले, अपघाताचे प्रमाण हे सायंकाळी व पहाटे जास्त असते.
या दरम्यान आपल्या यंत्रणेने सतर्क राहायला हवे. जिल्ह्यात अनेक असे अतिक्रमण आहेत, ज्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. ते अतिक्रमण काढण्याचा सूचना केल्या. विशेषतः गेवराई तालुक्यातील गढी भागात अनेक वेळा अपघात झालेले आहेत. त्या ठिकाणी तांत्रिक सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यात कोठेही अपघात झाला तर त्या ठिकाणी रुग्णहिका तात्काळ मिळावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना केल्या.
माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील पुलाचे काम तातडीने सुरू करावे असे म्हणत, लोकांची अडवणूक होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, तेलगाव या ठिकाणी रस्त्याचे पाणी व्यवस्थित न काढल्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.
ते दुरुस्ती करण्यात यावे. राष्ट्रीय महामार्ग खात्याचे स्वतंत्र ऑफिस बीड जिल्ह्यात होण्यासाठी आर. ओ ऑफिसला प्रस्ताव पाठवा, अशा सुचना देखील दिल्या. राष्ट्रीय महामार्ग संस्थेचे स्वतंत्र कार्यालय बीडला झाल्यास जिल्ह्यातील कामे वेळेत मार्गी लागतील, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. खरवंडी-मादळमोही-पाडळ सिंगी गढी माजलगाव या महामार्गावरील कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्यामुळे अपघात होत असले बाबत तक्रारी होत आहेत. भविष्यात अपघात होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, असेही म्हटले.
पैठण - पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग मधील डोंगरकिन्ही ते पारगाव घु. (अनपटवाडी) रस्त्याचा दर्जा अत्यंत खराब आहे. तसेच मळेकरवाडी घाटातील डांबरीकरणाचे काम वारंवार सूचना देऊनही अद्याप सुरू झालेले नाही. या रस्त्याच्या संपूर्ण कामात जागोजागी मोठ-मोठ्या भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे रोज दुचाकी चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. पाटोदा शहरातील रस्ता काम अपूर्ण आहे. संपूर्ण रस्त्याचे काम अंदाजपत्रकातील निकषाप्रमाणे प्रमाणे पुन्हा करून घेण्यात यावे. एजन्सीवर आवश्यक ती कार्यवाही प्रस्तावित करावी. अतिरिक्त बाब या नावाने करण्यात आलेल्या अनावश्यक खर्चाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी व जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असे खा सोनवणे यांनी म्हटले.