

Former Minister Dhananjay Munde's allegations against Kshirsagar
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची आ.धनंजय मुंडे यांनी सोमवारी विधानभवन मुंबई येथे भेट घेतली. या प्रकरणात बीड जिल्ह्याबाहेर सेवेत असलेल्या एका अनुभवी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून स्वतंत्र चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. तसेच आरोपीचे आ. संदीप क्षीरसागर यांच्याशी निकटचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला.
बीड शहरातील उमाकिरण संकुलात आरोपी विजय पवार व प्रशांत खटोकर यांनी अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी वैद्यकीय रजेवर व अन्य तालुक्यात नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत नाट्यमयरीत्या अटक केली असून, या प्रकरणात सुरू असलेला तपास समाधानकारक नाही, तसेच अनेक मुलींचे लैंगिक शोषण या नराधमांनी केले असून त्यांना असलेल्या स्थानिक राजकीय पाठबळामुळे इतर पीडित मुली तक्रार द्यायला धजावत नाहीत, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दबावातून या आरोपींना वाचवण्याचे काम केले जाऊ शकते, त्यामुळे या प्रकरणात पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एका महिला आयपीएस अधिकारी यांच्यामार्फत स्वतंत्र निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
तपासात डिजिटल पुरावे गोळा करणे ही प्राथमिकता होती, मात्र आरोपी, त्यांचे नातेवाईक, मदत करणारे यांचे सीडीआर, आयपीडीआर, व्हॉट्सअॅप चॅट, इन्स्टा, चॅट, प्रायव्हेट कॉलिंग, मोबाईल डेटामधील व्हिडिओ, फोटो, व्हॉट्सअॅप कॉल, फेस टाईम कॉल यांपैकी पोलिसांनी अद्याप काहीही ताब्यात घेतले नसल्याची माहिती आहे. तसेच संकुलात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये १३ जून पूर्वीचे फुटेज उपलब्ध नाही, अशा अनेक त्रुटी पोलिस तपासात दिसून येत असल्याचा उल्लेखही मुंडे यांनी केला आहे.
या प्रकरणातील पीडिता व तिच्या कुटुंबीयांना स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निकटवर्तीयांकडून धमकावले जात असून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, अशाच प्रकारच्या दबावामुळे इतर पीडित मुली समोर येऊन तक्रार द्यायला धजावत नाहीत, असेही मुंडेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.