

कडा ः आष्टी पोलिस स्टेशनच्या पथकाने कडा येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या सुगंधित गुटखा (मावा) निर्मिती कारखान्यावर कारवाई करत बेकायदेशीर व्यवसायाचा मोठा पर्दाफाश केला. यावेळी साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टीचे पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कडा येथे एका बंदिस्त जागेत अवैधरीत्या सुगंधित गुटखा (मावा) तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून पोलिस निरीक्षक भुतेकर व सहायक पोलिस निरीक्षक नरवडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकण्यात आल्याने कारखान्यात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी कारवाई दरम्यान तयार सुगंधित गुटखा (मावा), कच्चा माल, पॅकिंग साहित्य, वजन काटे, सीलिंग मशीन,मिक्सर,इतर यंत्रसामग्री व साहित्य असा अंदाजे साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.जप्त केलेला सर्व मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई प्रशांत क्षीरसागर, तागड, काकड, भाऊसाहेब आहेर, अमोल नवले, सव्वाशे,जमदाडे, वाणी, सजगणे, बनसोडे आदी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली सदर प्रकरणी संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा कायदा, तंबाखू प्रतिबंधक कायदा तसेच इतर लागू कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध गुटखा व्यवसायाची साखळी शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.