

पारध ः भोकरदन तालुक्यातील पारध येथे वांग्याच्या बाजारभावाने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. काबाडकष्ट करून पिकवलेल्या वांग्याला सध्या केवळ 80 ते 100 रुपये कॅरेट असा कवडीमोल दर मिळत असून, एका कॅरेटमध्ये 12 ते 15 किलो वांगी येत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात प्रतिकिलो अवघे चार ते पाच रुपयेच पडत आहेत. या दरात उत्पादन खर्च तर दूरच, मजुरीसुद्धा निघणे अशक्य झाले आहे.
बी-बियाणे, खत, औषध फवारणी, पाणी, मजूर, वाहतूक यावर हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी वांगे पिकवले; मात्र बाजारात माल नेल्यानंतर मिळणारी रक्कम पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. “घाम गाळून उगवलेले पीक आज मातीमोल झाले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
एकीकडे महागाई आकाशाला भिडलेली असताना दुसरीकडे शेतमालाला मात्र कोणताही आधारभाव नाही. शेतकऱ्यांच्या मेहनतीला किंमत देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. बाजार समित्यांतील दलालांची मनमानी, नियोजनाचा अभाव आणि शासनाची उदासीनता यामुळेच शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप होत आहे.
जर अशीच परिस्थिती कायम राहिली, तर शेतकऱ्यांनी शेती करायची तरी कशी? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तत्काळ बाजारभाव स्थिर करण्यासाठी ठोस उपाययोजना, हमीभाव व शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयांची मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा “शेतकऱ्यांच्या पदरी फक्त कर्ज, नुकसान आणि निराशाच उरणार,” असा इशाराही शेतकरी देत आहेत.
शेतकरी हतबल - राजकीय पुढाऱ्यांची वांगी करोडात विकली जातात, पण शेतकऱ्यांची वांगी चार-पाच रुपये किलोने विकावी लागतात. हाच का शेतकरी आणि सत्तेत बसलेल्यांमधला फरक? आम्ही शेतात घाम गाळतो, कर्ज काढतो, रात्रंदिवस राबतो; पण बाजारात गेल्यावर आमची मेहनत मातीमोल ठरते. जर ही लूट थांबली नाही, तर शेती करणे म्हणजे हळूहळू संपवण्यासारखच होईल.
विजय तबडे, शेतकरी