

Prostitution Racket
केज : केज येथे कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशाने पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकला. यामध्ये केंद्राच्या मॅनेजरला ताब्यात घेत त्याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला असून दहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील उमरी शिवारात असलेल्या महालक्ष्मी कला केंद्रात कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना मिळाली. कला केंद्राचे मालक, चालक आणि मॅनेजर हे त्यांच्या फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून केंद्रातील महिलांचे लैंगिक शोषण करीत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक काँवत यांनी नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना कारवाईचे आदेश दिले.
त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार बहीरवाळ, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक अविनाश घुंगर्ड, पोलीस शिपाई शुभम घुले, महीला पोलीस अर्चना वंजारे, महिला पोलीस भाग्यश्री खांडेकर यांच्या पथकाने दि. २४ एप्रिल रोजी मध्यरात्री ३:३० वा. च्या सुमारास डमी ग्राहक व दोन पंचांसह महालक्ष्मी कला केंद्रात डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यावेळी छापा टाकला असता सदर ठिकाणी महालक्ष्मी कला केंद्राचा मॅनेजर मयूर अंधारे याला पोलिसांनी ताब्यात घेत कला केंद्रातील दहा पीडित महिलांची सुटका केली आहे.
या छाप्यात पोलिसांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी वापरण्यात येणारे दहा कंडोमची पाकिटे आणि डमी ग्राहकाकडे दिलेल्या ५०० रू. च्या नोटा असा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी स्वतः पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे तपास करीत आहेत.