

वडवणी ः वडवणी तालुक्यातील चिंचवण, कोठारबन, चिखलबीड, सोन्नाखोटा, पिंपळटक्का, रूई, पिंपळा आदी गावांसह संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी (ॲग्रीस्टेक) मध्ये प्रत्यक्ष नावावरील क्षेत्र चुकीचे दाखवले जात असल्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेचा ऑनलाईन अर्ज भरताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
फार्मर आयडी नोंदणीदरम्यान प्रत्येक शेतकऱ्याच्या गटामध्ये क्षेत्र 1.99आर.असे दाखवले जात असून हे पूर्णतः चुकीचे आहे. यामुळे पोखरा योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरताना जास्तीचे किंवा अपूर्ण क्षेत्र नोंदवले जात असून शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. या संदर्भात तालुका कृषी कार्यालय, तलाठी व मंडळ अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
काही गावांचा पोखरा योजनेत समावेश झालेला असतानाही फार्मर आयडीमधील तांत्रिक त्रुटीमुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत तहसीलदार वडवणी यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयामार्फत तत्काळ फार्मर आयडी (ॲग्रीस्टेक) मध्ये ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा वडवणी तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे, तालुकाध्यक्ष सुखदेव रेडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ईश्वर तांबडे, अंकुश वारे, राम सावंत, श्रीमंत मुंडे, बाबुराव तवरे, अंगद बडे,नवनाथ तुरे, भाऊसाहेब तांबडे, आसाराम मात्रे, सदाशिव नखाते, विश्वनाथ बडे,प्रताप मात्रे, सुरेश दोडताले, बाबा गिलबिले, विश्वनाथ गिलबिले,अर्जुन बडे, हरीराम बडे, विष्णू मात्रे, गोरख मात्रे, संतराम हजारे,शेख सादिक, देवानंद तांबडे, बाबूराव कोठुळे, नामदेव डोंगरे, अर्जुन पोटे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.