

वरूड ः मुला-मुलींची लग्ने कमी खर्चात करून उर्वरित रक्कम संसारासाठी उपयोगी भांडवल म्हणून उभी करावी. अनावश्यक खर्च टाळून तरुण पिढीला उद्योग-व्यवसायाकडे वळवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा योध्दा मनोज जरागे पाटील यांनी केले.
भोकरदन तालुक्यातील भंडारगड येथे दिलीप वाघ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहास मराठा योद्धा मनोज जारंगे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी हरिनाम सप्ताहात सहभागी झालेल्या भाविकांना त्यांनी मार्गदर्शन केले.
मनोज जारंगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून नांदेड जिल्ह्याला पहिला आयपीएस अधिकारी मिळाल्याचा उल्लेख करत समाजासाठी हे मोठे व प्रेरणादायी यश असल्याचे सांगितले. शिक्षण, संयम आणि संघटित प्रयत्नांमुळेच समाज प्रगती करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आरक्षणाचा लढा हा कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या मागे फिरण्यासाठी नाही, तर समाजाच्या हक्कासाठी आहे. आजची संपूर्ण युवा पिढी ही राजकीय स्वार्थापेक्षा समाज बांधवांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली पाहिजे.
संघटन हीच आपली खरी ताकद आहे. मराठा समाजातील गोरगरिब, कष्टकरी कुटुंबातील मुलांना न्याय मिळावा, त्यांना शिक्षण, नोकरी आणि संधी मिळावी यासाठी हा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे युवकांनी केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता, समाजातील गरजू बांधवांना मदतीसाठी धावून यावे. हा लढा शांततेचा, संविधानिक आणि न्याय मिळेपर्यंत अखंड सुरू राहील. समाज एकत्र आला तर आरक्षण निश्चितच मिळेल.”असे सांगितले.
खरी ताकद
आरक्षणाचा लढा हा कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या मागे फिरण्यासाठी नाही, तर समाजाच्या हक्कासाठी आहे. आजची संपूर्ण युवा पिढी ही राजकीय स्वार्थापेक्षा समाज बांधवांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली पाहिजे. संघटन हीच आपली खरी ताकद असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.