Stray Dogs Attacks : मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा चिमुकल्यावर हल्ला

बीड : फरफटत नेल्याचा प्रकार; संतप्त नागरिकांची बंदोबस्त करण्याची मागणी
Stray Dogs Attacks
Stray Dogs Attacks : मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा चिमुकल्यावर हल्लाfile photo
Published on
Updated on

Pack of stray dogs attacks young child.

बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पंढरी नगरी भागात आपल्या घरासमोर खेळत असलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्यावर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Stray Dogs Attacks
Stray Dogs News : मनपा लावणार शहरातील मोकाट कुत्र्यांना कॉलर बेल्ट

राजवीर रविकुमार जायभाय (६, रा.पंढरी नगरी, धानोरा रोड, बीड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. राजवीर हा त्याच्या घरासमोरील रस्त्यावर खेळत असतांना अचानक त्या ठिकाणी आलेल्या कुत्र्याच्या टोळीने त्याच्यावर हल्ला चढवला. मोठ्या संख्येने कुत्रे अंगावर आल्याचे पाहून राजवीर याने तेथून निघण्याचा प्रयत्न करत पायरीवर चढला, परंतु कुत्र्यांनी त्याला अक्षरशः ओढत पुन्हा रस्त्यावर आणले. हा प्रकार जवळच असलेल्या एका व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याने तातडीने त्याच्याकडे धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावले. या हल्ल्यात जखमी झालेल्या राजवीरने एकच आक्रोश केल्याने कुटूंबीयांनी त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पेठ बीड, बार्शी नाका, मोमीनपुरा, झमजम कॉलनी यांसारख्या अनेक भागांत मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर, विशेषतः लहान मुलांवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेकांना चावा घेण्याच्या घटनाही वाढल्या असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, एवढ्या घटना घडूनही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस आणि प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Stray Dogs Attacks
Latur Stray Dog Attack : शिरूर अनंतपाळमध्ये मोकाट कुत्र्यांचा थरार; १२ कोकरांचा लचके तोडून मृत्यू

नागरिकांची प्रशासनावर नाराजी

या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत एखाद्याचा जीव गेल्यावरच नगरपालिका जागी होणार का?" असा संतप्त सवाल उपस्थित करत तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. तसेच शहरात विशेष मोहीम राबवून मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण आणि नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

टेंडर दिलेली व्यक्ती पळाली

नगरपालिकेने बीड शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रीत रहावी याकरिता निर्बीजीकरण करण्यासाठी टेंडर दिले होते. त्याकरिता आवश्यक त्या सुविधा देखील त्या कंत्राटदाराला दिल्या होत्या. त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात हे काम सुरु करत पाचशेहून अधिक कुत्रे पकडून निर्बीजीकरण देखील केले, परंतु त्याला कोणीतरी जावून मारहाण केली तसेच धमकावल्याने तो काम अर्धवट सोडून पळून गेला

नव्याने प्रक्रिया राबवणार : मुख्याधिकारी

बीड शहरातील विविध भागात कुत्र्यांची संख्या वाढल्याने समस्या निर्माण होत आहेत. याबाबत तक्रारी देखील आल्या आहेत. यापूर्वी ज्या व्यक्तीला टेंडर दिले होते, तो निघून गेला आहे. आता नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन कुत्र्यांचे जाणार निर्बीजीकरण केले असल्याची माहिती मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news