

शिरूर अनंतपाळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, सोमवारी (१६ मार्च) रात्री एका भीषण घटनेत भटक्या कुत्र्यांच्या टोळीने १२ शेळीच्या पिल्लांचा बळी घेतला. या हल्ल्यामुळे एका गरीब मेंढपाळ कुटुंबाचे कंबरडे मोडले असून, परिसरात मोकाट कुत्र्यांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहरातील मेंढपाळ विश्वंभर श्रीहरी सोनटक्के हे शेळ्या पाळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या त्यांनी शहरातील शेतकरी किरण काळे यांच्या शेतात शेळ्या मुक्कामास बसवल्या होत्या. पिल्लांच्या संरक्षणासाठी त्यांनी सभोवती जाळीही लावली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांच्या टोळीने ही जाळी फाडून आत प्रवेश केला आणि कोकरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात १२ पिल्लांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मेंढपाळाचे सांत्वन केले. जिल्हा परिषद सदस्य माणिक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक कोरे यांच्यासह सुधीर लखनगावे, व्यंकटराव कल्ले व संभाजी पारशेट्टे यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली. कष्टकरी मेंढपाळाला शासनाने विशेष मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री-अपरात्री रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून आता पाळीव प्राण्यांनाही लक्ष्य केले जात आहे. नगरपालिका प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.