

Parli Voting Turnout
परळी वैजनाथ : उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. परळी वैजनाथ येथील मतदान केंद्रावर महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष तसेच मित्रपक्षांच्या नगरसेवक मतदारांनी एकत्रितपणे उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी एकजूट दाखवत मतदान केले. मतदान केंद्रावर महायुतीच्या पदाधिकारी व नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी परळी वैजनाथ येथे एकूण ४० मतदार नोंदणीकृत होते. विशेष म्हणजे या सर्व मतदारांनी मतदान केल्याने येथे १०० टक्के मतदानाची नोंद झाली.
परळी नगर परिषदेवर ना. पंकजा मुंडे आणि आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता आहे. त्याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत महायुतीच्या नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून संघटनेतील एकात्मता आणि ताकद दाखवून दिली.
यावेळी नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्षा खैसर राजाखान पठाण यांच्यासह महायुतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. सर्वांनी एकदिलाने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत महायुतीची भक्कम एकजूट अधोरेखित केली.
या निमित्ताने परळी नगरपालिकेतील महायुतीचे संघटनात्मक बळ आणि अंतर्गत एकोपा पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.